बॉलिवूडचे तीनही खान कायम चर्चेत असतात. सध्या आमिर खान चित्रपटापासून दूर असला तरी त्याच्या कमबॅकची सगळीकडे चर्चा आहे. शाहरुख खान लागोपाठ ‘पठाण’ आणि ‘जवान’सारखे सुपरहीट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसचा खरा किंग तोच आहे हे सिद्ध केलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेला सलमान खानचा बहुचर्चित ‘टायगर ३’सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी करतोय. इतकी वर्षं हे तिघे या इंडस्ट्रीत काम करतायत, परंतु आजतागायत या तिघांना एकत्र घेऊन चित्रपट करायचं धाडस अद्याप कुणी केलेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फार आधी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पेहला नशा’ या चित्रपटात शेवटचे एकत्र दिसले होते आणि तेसुद्धा काही सेकंदांच्या कॅमिओसाठी. ते सोडल्यास अद्याप या तिघांना एकत्र घेऊन चित्रपट करायचं स्वप्न हे बऱ्याच दिग्दर्शकांचं आहे. कित्येकांनी यासाठी प्रयत्न पण केले होते, परंतु हे समीकरण जुळून आलंच नाही. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने या तिघांना एका चित्रपटासाठी विचारलं होतं अन् या तिघांनी त्यावेळी तो चित्रपट करण्यास नकार दिला होता, अर्थात तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकुन आपटलाही होता. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘रामायण’चे चित्रीकरण लवकरच होणार सुरु, निर्माते मधू मंटेना यांनी घेतला प्रोजेक्टमधून काढता पाय

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एकदा हे धाडस केलं होतं. अनुपम खेर यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकाच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि त्यासाठीच त्यांनी सलमान, शाहरुख आणि आमिर यांना मुख्य भूमिकेसाठी विचारलं होतं. हा चित्रपट म्हणजे २००२ साली प्रदर्शित झालेला ‘ओम जय जगदिश’. या चित्रपटातील तीन भावांच्या भूमिकेसाठी अनुपम यांनी या तिघांना विचारलं होतं अन् तिघांनीही हा चित्रपट करण्यास त्यावेळी नकार दिला होता.

फोटो : सोशल मिडिया

इतकंच नव्हे तर या तिघांबरोबरीनेच अनुपम खेर यांना काजोल, प्रीती जिंटा आणि राणी मुखर्जी या तीन टॉपच्या अभिनेत्रींना या तिघांच्या हिरॉईन म्हणून घ्यायचं होतं. अनुपम खेर यांनी या सहा स्टार्सना याबद्दल विचारलं पण त्या सगळ्यांनी हा चित्रपट करण्यास साफ नकार दिला होता. निर्मितीसाठी अनुपम खेर यश राज स्टुडिओकडेही हा चित्रपट घेऊन गेले पण त्यांनीही याच्या निर्मितीसाठी नकार दिला. अशात निर्माते वाशु भग्नानी हे अनुपम खेर यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली.

२००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘ओम जय जगदीश’मध्ये अनिल कपूर, अभिषेक बच्चन, फरदीन खान, महिमा चौधरी, उर्मिला मातोंडकर आणि तारा शर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने केवळ १२.३० कोटींची कमाई केली. हा अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला, यानंतर आजवर ते पुन्हा दिग्दर्शनाकडे वळलेले नाहीत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh aamir and salman rejected anupam khers directorial om jai jagadish avn