Hema Malini Called Shahrukh Khan Ugly : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा प्रवास हा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच आहे. दिल्लीहून मुंबईत येऊन त्यानं अनेक संघर्षांचा सामना केला. छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात करून आज चित्रपटसृष्टीत त्यानं आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे. शाहरुख दोन पिढ्यांच्या गळ्यातला ताईत आहे. किंग खान म्हणून त्यानं बॉलीवूडमध्ये आपलं स्वत:चं नाव निर्माण केलं आहे.

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बंगल्यांपैकी एक असलेलं ‘मन्नत’ मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शाहरुखनं, इंडस्ट्रीचा ‘बादशाह’ बनण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण केला आहे. पण, अर्थात त्याचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता.

टीव्हीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास करण्यासाठी शाहरुखनं अपार मेहनत आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे तो आज जगभरात लोकप्रिय आहे. आज अवघ्या बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखला या इंडस्ट्रीत पहिल्यांदा ब्रेक देणाऱ्या व्यक्ती होत्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी. अलीकडेच निर्माता विवेक वासवानी यांनी एका मुलाखतीत शाहरुखच्या पहिल्या ब्रेकसंदर्भात एक आठवण सांगितली.

स्ट्रगलच्या काळात विवेक वासवानींबरोबर राहायचा शाहरुख

त्या काळात शाहरुख खान विवेक वासवानी यांच्याबरोबर राहत असे आणि तो आपला पहिला चित्रपट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. याबद्दल विवेक सांगतात, “एकेदिवशी हेमा मालिनींचा माझ्या घरी फोन आला. तो फोन माझ्या वडिलांनी उचलला. त्यांनी ‘कोण बोलतंय?’ असं विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, ‘हेमा मालिनी – सुपरस्टार!’ मग वडिलांनी मला झोपेतून उठवलं आणि म्हणाले, ‘हेमा मालिनी फोनवर आहेत!’”

पुढे विवेक वासवानींनी सांगितलं, “हेमा मालिनींनी मला शाहरुखबद्दल विचारलं. त्या त्याच्याशी एका नव्या प्रोजेक्टसाठी बोलू इच्छित होत्या. त्यांनी फोनवर विचारलं, ‘तो मुलगा शाहरुख खान अजून तुझ्याच घरी झोपलाय का?’ मी म्हटलं, ‘हो.’ मग त्यांनी सांगितलं, ‘त्याला लगेच उठव, मी बोलते.’ मग शाहरुख उठला आणि त्यांनी त्याला संध्याकाळी ५ वाजता घरी येण्यासाठी सांगितलं.”

शाहरुख खानला पाहून हेमा मालिनींची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

पुढे विवेक म्हणाले, “मी आणि शाहरुख… आम्ही दोघं खूपच नर्व्हस होतो. हेमाजींच्या घरी गेलो तर समोर कोणीतरी पेपर वाचत होतं. आम्ही ओळखलंच नाही, पण जेव्हा त्यांनी पेपर खाली केला, तेव्हा लक्षात आलं – ते धर्मेंद्र होते. मग थोड्याच वेळात हेमा मालिनी आल्या आणि शाहरुखकडे बघत म्हणाल्या, ‘पण तू तर खूप कुरूप आहेस!’” तेव्हा मी त्यांना विचारलं, “मग तुम्ही त्याला साइन का करताय?” त्यावर हेमा मालिनी म्हणाल्या, “आमिर खान आणि सलमान खाननं ही भूमिका नाकारली आहे.”

पुढे विवेक हसत-हसत म्हणाले, “मी लगेच सांगितलं, ‘राकेश रोशन आणि रमेश सिप्पी यांनी शाहरुखला आधीच साइन केलंय.’ अर्थात ते खोटं होतं, पण जेव्हा कोणाचं करिअर घडवायचं असतं, तेव्हा थोडं ‘राजासारखं’ खोटं बोलायला हरकत नसते.” पुढे विवेक सांगतात, “त्यावर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मी तुला ५० हजार रुपये देईन आणि मी हेमा मालिनी आहे, त्यामुळे याबद्दल काही प्रश्न नाही!'”

शेवटी शाहरुख खानला ५०,००० रुपयांच्या मानधनावर चित्रपटात कास्ट करण्यात आले. ‘दीवाना’ हा शाहरुखचा पहिला सिनेमा असला तरी प्रत्यक्षात त्यानं पहिला साइन केलेला सिनेमा ‘दिल आशना है’ होता. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल आशना है’मध्ये शाहरुख खान, जितेंद्र, डिंपल कपाडिया, अमृता सिंह, मिथुन चक्रवर्ती आणि दिव्या भारती यांच्या भूमिका होत्या. हेमा मालिनी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला.