‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. यापैकी शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट ‘डंकी’च्या आधी प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. परंतु मध्यंतरी या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली.

हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी येणार आहे. मध्यंतरी या चित्रपटाच्या सेटवरील बरेच फोटोही लिक झाले ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आणखी वाचा : ‘बाहुबली’नंतर आलेला प्रभासचा एकही चित्रपट सुपरहीट का ठरला नाही? ही आहेत चार प्रमुख कारणं

‘दैनिक भास्कर’च्या रीपोर्टनुसार शाहरुखचा’जवान’चं बजेट २०० ते २५० कोटी इतकं असून यात व्हीएफएक्सचा पुरेपूर वापर केलेला पाहायला मिळणार आहे. असं म्हंटलं जात आहे की ‘जवान’ हा कमल हासन यांच्या ‘Oru Kaidhiyin Diary’ आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘आखिरी रास्ता’ या दोन चित्रपटांपासून प्रेरित आहे. इतकंच नव्हे तर ‘जवान’ हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट असणार आहे आणि यासाठी खास जपानहून अॅक्शन डायरेक्टर बोलावण्यात आले होते.

‘मर्सल’, ‘बीगिल’सारखे जबरदस्त हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक अ‍ॅटलीला ‘जवान’वर पूर्ण विश्वास आहे की हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरेल. याचसाठी अ‍ॅटलीने या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून वेगळं मानधन घेतलेलं नसून तो या चित्रपटाच्या होणाऱ्या नफ्यामध्ये भागीदार असणार आहे हे स्पष्ट झालं आहे. सलमान खान, शाहरुख खान हे असे अभिनेते आहेत जे चित्रपटासाठी वेगळं असं मानधन न घेता थेट त्याच्या नफ्यात भागीदारी घेतात.

या चित्रपटात शाहरुखबरोबर नयनतारा, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर रिद्धी डोग्रासारखे कलाकार दिसणार आहेत. शिवाय यात शाहरुखसमोर विजय सेतुपतीही नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.