Shilpa Shetty restaurant Bastian Single Night Earning : शिल्पा शेट्टी बास्टियन या रेस्टॉरंटची सह-मालकीण आहे. या रेस्टॉरंटमधून ती एका रात्रीत जितकी कोट्यवधी रुपयांची कमाई करते. बास्टियनच्या एका रात्रीच्या कमाईचा आकडा थक्क करणारा आहे. लेखिका शोभा डे यांनी स्वतः बास्टियनमध्ये जाऊन या रेस्टॉरंटच्या कमाईबद्दल जाणून घेतलं. लोक इथे एका रात्रीत लाखो रुपयांचा खर्च करतात असंही त्यांनी नमूद केलं.
मोजो स्टोरीशी बोलताना शोभा म्हणाल्या, “मुंबईत रेस्टॉरंटमधून भरपूर कमाई होते. मुंबईतील एका रेस्टॉरंटची एका रात्रीची कमाई २-३ कोटी रुपयांची असते. स्लो नाईटमध्ये २ कोटी रुपये आणि वीकेंडला ३ कोटी रुपयंची उलाढाल होते. मी स्वतः ते पाहण्यासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते; कारण जेव्हा मी हे आकडे ऐकले, तेव्हा मलाच ते खरे वाटले नव्हते.”
बास्टियनबद्दल काय म्हणाल्या शोभा डे?
बरखा दत्त शोभा यांना कोणत्या रेस्टॉरंटबद्दल बोलताय, असं विचारल्यावर त्यांनी नाव घेतलं. “मी बास्टियनबद्दल बोलत आहे. हे नवीन बास्टियन आहे. ते २१,००० फूट चौरस फूट जागेत पसरलं आहे. तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला ‘मी कुठे आहे?’ असा प्रश्न पडतो. इथे तुम्हाला शहराचा ३६०° व्ह्यू दिसतो,” असं शोभा डे म्हणाल्या.
लक्झरी गाड्यांमध्ये येतात लोक
शिल्पा शेट्टीच्या या रेस्टॉरंटमध्ये एका रात्रीत जवळपास १,४०० लोक येतात. इथे येणारे पाहुणे महागड्या गाड्यांमध्ये येतात. “ते ७०० लोकांसाठी प्रत्येकी दोन सीटिंग देतात आणि एका रात्रीत इथे १,४०० लोक येऊ शकतात. दादरमध्ये बास्टियनच्या बाहेर रस्त्यावर लोक खाली वाट पाहत असतात, इतकी वेटिंग लिस्ट या रेस्टॉरंटबाहेर असते. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये लोक लॅम्बोर्गिनी आणि अॅस्टन मार्टिनसारख्या लक्झरी गाड्यांमध्ये येतात. हे लोक कोण आहेत? मला काहीच माहिती नाही,” असं शोभा डे म्हणाल्या.
लोक लाखो रुपये करतात खर्च
शोभा डे यांनी बास्टियनमधील त्यांचा अनुभव सांगितला. त्यांना त्या रेस्टॉरंटमध्ये एकही ओळखीचा चेहरा आढळला नव्हता. “मला धक्का बसला होता, कारण तिथे ७०० जण जेवत होते, त्यांच्यापैकी एकही चेहरा माझ्या ओळखीचा नव्हता. काही तरुण होते आणि ते त्यांच्यासाठी टकीलाच्या बाटल्यावर बाटल्या मागवत होते. प्रत्येक टेबलवरील लोक लाखोंमध्ये खर्च करत होते, पण ते पूर्णपणे अनोळखी होते,” असं शोभा म्हणाल्या.
६ वर्षांपूर्वी बास्टियनची सह-मालकीण झाली शिल्पा
शिल्पा शेट्टीने २०१९ मध्ये बास्टियन ब्रँडचे संस्थापक व रेस्टॉरंट मालक रणजीत बिंद्रा यांच्याबरोबर या व्यवसायात भागीदारी केली. आता ती संपूर्ण भारतातील अनेक बास्टियन रेस्टॉरंट्सची सह-मालकीण आहे. या ब्रँडमध्ये तिची भागीदारी ५० टक्के हे. कुणाल विजयकरशी बोलताना शिल्पाने ती भारतातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट मालकांपैकी एक असल्याची कबुली दिली होती.
दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्यावर जुहू येथील एका व्यावसायिकाची ६०.४८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अलिकडेच परदेशात त्यांच्या रेस्टॉरंटचा व्यवसाय वाढवण्यासाठी अमेरिका आणि इतर देशांमध्ये प्रवास करण्याची त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. परदेशात प्रवास करण्याची परवानगी मिळविण्यासाठी त्यांना सर्वात आधी ६० कोटी रुपये जमा करावे लागतील, असं न्यायालयाने म्हटलंय.