अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फक्त नायिकाच नाही, तर तिनं खलनायिकेची भूमिका साकारूनही प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयानं अनेकांना भुरळ घातली होती. आजही तिची क्रेझ कायम असल्याचं दिसतं. परंतु, असा एक चित्रपट होता, ज्यामध्ये सोनालीला तिला अपेक्षित असलेली भूमिका साकारायला मिळाली नसल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं. याबाबत तिनं एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने ‘ड्युप्लिकेट’ या तिच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली, ” ‘ड्युप्लिकेट’ चित्रपटातील माझी भूमिका ही ग्रे शेडची (खलनायिकेची) असणं अपेक्षित होती. पण, जेव्हा चित्रीकरण सुरू झालं तेव्हा त्यामध्ये माझी दुय्यम भूमिका असल्याचं लक्षात आलं.” परंतु, महेश भट्ट यांच्यासह असलेल्या चांगल्या संबंधामुळे तिनं या चित्रपटात आहे तशी भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. पुढे महेश भट्ट यांच्या ‘जखम’ चित्रपटाचा उल्लेख करताना अभिनेत्री म्हणाली, “‘जखम’मध्ये पूजा भट्ट मुख्य नायिका आहे याबाबत मला माहीत होतं. परंतु, कथा चांगली असल्यानं मी ती भूमिका करण्याचा निर्णय घेतला.”
‘ड्युप्लिकेट’बद्दल बोलताना ती म्हणाली, “‘जखम’मधील भूमिकेबद्दल मला कल्पना होती; पण या चित्रपटात (ड्युप्लिकेट) माझ्या भूमिकेची लांबी अधिक असणं अपेक्षित होतं.” ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना सोनाली म्हणाली होती, ” ‘ड्युप्लिकेट’ चित्रपटातील भूमिकेसाठी मी खूप उत्सुक होते. कारण- मला सुरुवातीला ती भूमिका खूप आव्हानात्मक वाटली होती. त्यामुळे त्याच पद्धतीनं आम्ही तयारी केली होती. पण, नंतर जेव्हा सगळं सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की, मला अपेक्षित होती तशी ही भूमिका नाही.”
दरम्यान, ‘ड्युप्लिकेट’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, जुही चावला, सोनाली बेंद्रे हे कलाकार झळकले होते. महेश भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट १९९८ ला प्रदर्शित झाला होता. त्या काळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. त्या चित्रपटाची खूप मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती. तर, महेश भट्ट दिग्दर्शित ‘जखम’ चित्रपटात अभिनेता अजय देवगण, पूजा भट्ट, सोनाली बेंद्रे, नागार्जुन यांसारखे कलाकार झळकले होते.