बॉलीवूड सेलिब्रिटींचा विषय निघाला ती त्यांच्या बंगल्यांचा उल्लेखही येतोच. अमिताभ बच्चन आलिशान जलसा बंगल्यात राहतात. शाहरुख खानचा मन्नत बंगला, सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर, इथे तर चाहत्यांची गर्दी असते. मुंबईत इतरही अनेक स्टार्सचे समुद्र किनाऱ्यावर बंगले आहेत. पण असे काही कलाकार आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत प्रचंड नाव कमावलंय, तरीही ते भाड्याच्या घरात राहतात.

प्रसिद्धी, यश, पैसा मिळाला की हक्काचं घर घेणं, गाडी घेणं याकडे लोकांचा कल असतो. बॉलीवूडमध्येही असाच ट्रेंड पाहायला मिळतो, पण काही लोक मात्र अपवाद आहेत. हे लोक घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. त्यामागे त्यांची कारणंही आहेत. भाड्याच्या घरात राहणाऱ्या अशाच काही बॉलीवूडकरांबद्दल जाणून घेऊयात.

अनुपम खेर

फिल्म इंडस्ट्रीत ४० पेक्षा जास्त वर्षांपासून सक्रिय असलेले अनुपम खेर अजूनही भाड्याच्या घरात राहतात. करिअरमध्ये शेकडो चित्रपट करणारे अनुपम खेर खूप पैसे कमवतात, पण मुंबईत त्यांचं स्वतःचं घर नाही. घर विकत घेऊन काहीच फायदा नाही, असं अनुपम यांना वाटतं.

कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी त्यांच्या घर न घेण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं. “मी ठरवलंय की मला घर घ्यायचं नाही, कारण मला त्याची गरज नाही. घर कोणासाठी घेऊ? त्यापेक्षा भाडं देऊन आरामात राहा,” असं ते म्हणाले होते. घर खरेदी करण्यासाठी जे पैसे लागतील, त्याचा वापर चांगल्या कामासाठी करता येईल, असं ते म्हणाले होते.

विद्या बालन

अभिनेत्री व प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरची पत्नी विद्या बालन भाड्याच्या घरात राहते. यामागचे कारण विद्या बालनने सांगितले होते. चांगलं घर मिळायला नशीब लागतं, असं विद्याने म्हटलं होतं. तिने १५ वर्षांपूर्वी तिच्या आईबरोबर घर शोधण्याचा तिचा अनुभव सांगितला होता. ती प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी वांद्रे किंवा जुहू येथे एक घर शोधत होती. या काळात तिला एक सुंदर घर मिळालं, पण ते बजेटबाहेर होतं. तिने ईएमआयचा पर्याय निवडला आणि घर विकत घेतलं. “जेव्हा मी त्या घरात गेले तेव्हा असं वाटलं की ते माझं घर आहे,” असं विद्या म्हणाली होती.

विद्या सिद्धार्थशी लग्न केल्यावरही घर शोधत होती. तिने जवळपास २५ घरं पाहिली, पण तिला एकही घर आवडलं नाही. त्यानंतर तिला व तिच्या पतीला एक घर आवडलं, पण ते घर विक्रीसाठी उपलब्ध नव्हतं, त्यामुळे दोघांनी तिथे भाड्याने राहायचं ठरवलं. आता विद्या व सिद्धार्थ याच घरात भाड्याने राहतात.

क्रिती सेनॉन

क्रिती सेनॉनचं मुंबईत स्वतःचं घर नाही, ती भाड्याच्या घराहत राहते. तिच्याही घराचं महिन्याचं भाडं लाखो रुपये आहे. ती मुंबईतील जुहू भागात एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

विकी कौशल व कतरिना कैफ

विकी कौशल व कतरिना कैफ दोघेही बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. या दोघांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत, पण तेही भाड्याच्या घरात राहतात. विकी-कतरिनाच्या जुहू येथील अपार्टमेंटचं महिन्याचं भाडं १७.१ लाख रुपये आहे.