Mumtaz on quit Films: सिनेसृष्टीपासून जवळजवळ ३५ वर्षे दूर असूनही बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री मुमताज यांचे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनत्रींपैकी एक म्हणून मुमताज यांना ओळखले जाते. एक काळ असा होता की, मुमताज चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेत असत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुमताज ७० च्या दशकात यशाच्या शिखरावर होत्या. मात्र, त्यांनी त्यावेळी कुटुंबावर लक्ष देण्यासाठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली. त्यानंतर त्या एकदाच १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘आंधियाँ’ या चित्रपटात काम करताना दिसल्या.

मुमताज काय म्हणाल्या?

आता नुकत्याच एका मुलाखतीत मुमताज यांनी मोठा खुलासा केला आहे. स्वत:च्या इच्छेने चित्रपटसृष्टी सोडली नाही, तर सासरच्या लोकांनी दबाव आणल्यामुळे करिअर सोडावे लागले, असा खुलासा त्यांनी केला आहे. मुमताज यांनी १९७४ ला करोडपती असणाऱ्या मयूर माधवानी यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्या लंडनला राहायला गेल्या.

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या, “लग्नाच्या वेळी माझ्या सासरच्यांनी सांगितले होते की, लग्नानंतर तू काम करू शकत नाहीस. त्यामुळे मी चित्रपटांतून ब्रेक घेतला. मी अशा वेळी लग्न केले होते, ज्यावेळी मी इंडस्ट्रीमध्ये सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरले होते. एका चित्रपटासाठी मी ७.५ लाख मानधन आकारत होते. पण, माझ्या सासरच्यांनी सांगितले की, मी लग्नानंतर काम करू शकत नाही.”

मुमताज पुढे म्हणाल्या, “मला माहीत आहे की, मी खूप लवकर काम सोडले. पण, त्यावेळी माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, तू जेव्हा ४०-५० वर्षांची होशील, तेव्हा तुला फक्त विशिष्ट प्रकारच्या भूमिका मिळायला सुरुवात होईल. आता तू एका चांगल्या कुटुंबाचा भाग बनत आहेस. माझ्या घरचे स्वार्थी नव्हते. त्यांनी पैसे कमावण्यासाठी माझ्यावर कधीही दबाव आणला नाही. माझी आई इराणची होती. ती रूढीवादी होती. कोट्यवधी कमवणाऱ्या मुलीला त्यांनी जाऊ दिले आणि त्यामुळे मला त्यांचा आदर वाटतो.”

याच मुलाखतीत मुमताज यांनी १९७२ साली प्रदर्शित झालेला सीता और गीता हा चित्रपट का नाकारला याचे कारणदेखील सांगितले. मुमताज म्हणाल्या की, रमेश सिप्पी त्या चित्रपटातील भूमिकेसाठी मला खूप कमी मानधन देत होते. त्या किमतीला मी चित्रपटात काम करणार नाही, असे सांगितले होते. आजही लोक मला टीव्हीवर काम करण्यासाठी विचारतात; पण २-३ लाख मानधन देतात. त्यामुळे मी भूमिका साकारण्यास नकार देते. मला किती मानधन दिले पाहिजे हे मला माहीत आहे. जर लोकांना मी काम करावे, असे वाटत असेल, तर त्यांनी योग्य ते मानधन दिले पाहिजे, असे म्हणत मुमताज यांनी त्यांची मानधनाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veterans actress mumtaz reveals reason of quit films says in laws forbade me from acting also recalls was the highest paid actress nsp