Who is Student of the Year 2 actor Vishal Brahma arrested for smuggling drugs : ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातील एका अभिनेत्याला ४० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. हा अभिनेता नेमका कोण? याबाबतची माहिती अखेर समोर आली आहे. विशाल ब्रम्हा असं या अभिनेत्याचं नाव आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटात विशालने सम्राटची भूमिका साकारली होती. विशाल ब्रह्मा याला चेन्नई विमानतळावर सोमवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली आहे.

विशाल ब्रम्हा सुमारे ४० कोटी रुपयांच्या मेथाकॅलोन नावाच्या ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचदरम्यान त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला त्याचे नाव अधिकाऱ्यांनी जाहीर केले नव्हते. पण आता त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मूळचा आसामचा रहिवासी असलेला विशालला एअर इंडियाच्या विमान एआय ३४७ मधून सिंगापूरहून चेन्नईला पोहोचताच अटक करण्यात आली. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, विशालला नायजेरियन ड्रग्ज सिंडिकेटने या अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी नेमलं होतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, ३२ वर्षीय विशाल ब्रह्मा आर्थिक अडचणींमुळे या अंमली पदार्थांची तस्करी करत होता. सुट्टीच्या बहाण्याने त्याला कंबोडियाला पाठवण्यात आलं होतं. तिथून परतताना त्याला ड्रग्ज असलेली ट्रॉली बॅग घेऊन जाण्यास सांगण्यात आलं होतं. अधिकारी आता यात सहभागी असलेल्या नायजेरियन सिंडिकेटचा शोध घेत आहेत.

विशाल ब्रह्मा कोण आहे?

विशाल ब्रह्मा सध्या ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्याने चर्चेत आहे. तो स्टुडंट ऑफ द इयर २ मधील त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. या चित्रपटात टायगर श्रॉफने मुख्य भूमिका साकारली होती. तर अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

विशालने फक्त स्टुडंट ऑफ द इयर २ नव्हे तर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिहू अटॅक’ मध्येही भूमिका साकारली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये, त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांवर त्याचे पैसे न दिल्याचा आरोप केला होता. आपण स्वखर्चाने सेटवर एक महिना काम केलं, पण निर्मात्यांनी पैसे किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असं तो म्हणाला होता.