गेल्या वर्षी कंगना राणावतने स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यावरून हलकल्लोळ माजला. तिच्या बाजूने मत दिल्याने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंवरही टीका झाली.  त्यानंतर आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, राज कुंद्रा प्रकरण, सुरेश चंद्रशेखरच्या जाळ्यात अडकलेल्या बॉलीवूड सुंदरी जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही, पनामा पेपर्समुळे अडलेली विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि नंतर त्यावरून सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची तथाकथित शाप देण्याची सरकारला धमकी, सोनू सूदचे समाजकारण भामटे असल्याची टीका, मालिकेतील नायिकेच्या वेशभूषेमुळे धार्मिक भावना दुखावल्याने दिग्दर्शक महेश कोठारेंनी मागितलेली माफी, राजकीय नेते नारायण राणेंची नक्कल केल्याने ‘चला हवा येऊ द्या’चे सर्वेसर्वा नीलेश साबळे यांना राणेंची मागावी लागलेली  माफी, ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील कलाकारांकडून त्रास दिला जात असल्याची अभिनेत्री अनुपमा विठ्ठल यांची तक्रार… अशा एक ना अनेक वादंगांनी वर्ष गाजवलं होतं. वादांचा हाच अध्याय नव्या वर्षातही पुढे सुरू राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजमाध्यमांच्या प्रसारामुळे मनोरंजन विश्वात होणाऱ्या वादविवादांना एक वेगळंच वळण आणि वेग मिळाला आहे. एरवीही बॉलीवूड अभिनेत्रींच्या कपड्यांवरून ते आता त्यांच्या समाजमाध्यमांवरील छायाचित्रं, वक्तव्यापर्यंत कुठल्याही छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वाद रंगतात. गेल्या वर्षी अनपेक्षित विषयांवरूनही वाद झडले होते. एक विषय संपतो न संपतो तोच दुसऱ्या विषयावरून चर्चा रंगायची. हीच परिस्थिती नव्या वर्षातही कायम राहते की काय, अशी शंका गेला महिनाभर सुरू असलेल्या वादविवादांमुळे व्यक्त होऊ लागली आहे…

 नव्या वर्षाचा आरंभच मुळी मनोरंजन विश्वातील वादविवादांनी झाला आहे. या वेळी बदल म्हणून हिंदीऐवजी मराठी मनोरंजन विश्वात वादांचा सिलसिला सुरू झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित झाला. त्याआधी चित्रपटाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात आले. या प्रोमोमधून स्त्रियांचे आणि लहान मुलांचे चुकीचे चित्रण केल्याची टीका समाजमाध्यमांवरून सुरू झाली. राज्य तसेच राष्ट्रीय महिला आयोगानेही याला विरोध करत महेश मांजरेकरांना त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले. प्रोमोतून ती दृश्ये ताबडतोब हटवण्याचीही विनंती त्यांना करण्यात आली. या वादाला आणखी कुठले वळण लागण्याआधीच महेश मांजरेकरांनीही लगेचच जाहीर निवेदन दिले. यात त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली, मात्र जनमानसाच्या भावना लक्षात घेत प्रोमोच नव्हे तर चित्रपटातूनही आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्यात आली असल्याचे त्यांनी जाहीर केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो पाहून प्रतिक्रिया द्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी प्रेक्षकांना केले. अर्थातच आता हा चित्रपट चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला आहे. त्यावर बऱ्या-वाईट प्रतिक्रया उमटत असल्या तरी वाद शमलेला आहे.

हे प्रकरण संपत नाही तोवर अभिनेता किरण मानेंना ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानक डच्चू दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. समाजमाध्यमांवर राजकीय मतं मांडल्यानेच वाहिनीवर दबाव आणून आपल्याला चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आले आहे, अशी पोस्ट माने यांनी टाकली. माने यांची पोस्ट सर्वदूर पसरताच त्याला राजकीय वळण लागले. पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचा दावा करणाऱ्या मानेंना लगोलग काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून समर्थन मिळाले. त्यातून वाहिनीनेही याबाबतची भूमिका तात्काळ स्पष्ट केली नाही, त्यामुळे हा संशय अधिकच बळावला. अखेर मानेंना राजकीय दबावातून नव्हे तर सेटवरील गैरवर्तणुकीमुळे काढून टाकण्यात आले आहे, या निर्मात्यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे वाहिनीकडून जाहीर करण्यात आले. या मालिकेतील सहकलाकारांनीही पुढे येऊन माने यांचे गैरवर्तन, उद्धट बोलणे याबद्दल माहिती दिली. त्यानंतरही या प्रकरणी ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे आणि किरण माने दोघांनाही समोरासमोर बोलवून बैठक घेण्याचा प्रयत्न मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. हाही प्रयत्न निष्फळ ठरला असला तरी हा वाद अजूनही काही प्रमाणात धुगधुगतो आहे.

पाठोपाठ अभिनेते अमोल कोल्हे यांचे राष्ट्रवादी पक्षातील स्थान त्यांनी कधीकाळी केलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसे यांच्या भूमिकेमुळे अडचणीत आले. राजकारणात येण्याआधी आपण हा चित्रपट केला होता, असे स्पष्टीकरण कोल्हे यांनी दिले. शिवाय, कलाकार म्हणून आपण एखादी व्यक्तिरेखा साकारली म्हणजे त्या व्यक्तीची विचारधारा आपल्याला मान्य आहे असा होत नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. तरीही यावरून त्यांना त्यांच्याच पक्षात लक्ष्य केले गेले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमोल कोल्हेंनी ही भूमिका कोणत्याही राजकीय पक्षात नसताना केली होती, याला दुजोरा देत त्यांना पाठिंबा दिला आहे. तरीही अजून अमोल कोल्हेंवरील राजकीय टीकास्त्र पूर्णपणे थांबलेलं नाही.

सध्या सुरू असलेल्या या वादविवादातून कलाकारच काय मालिकाही सुटलेल्या नाहीत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात स्वामी समर्थांनी मालोजी राजे भोसले यांच्या कानशिलात लगावल्याचे दृश्य होते. या दृश्यावर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात आला. हा वाद फार वाढलेला नसला तरी मालिकेतील आशय-विषयांचा संदर्भ लक्षात न घेता कोणत्याही गोष्टींवरून टीका केली जाऊ शकते, याची प्रचीती पुन्हा एकवार मनोरंजन विश्वाने घेतली आहे. हिंदी चित्रपट आणि मालिकांवरून होणारे वादविवाद आपल्या सवयीचे आहेत. मात्र नव्या वर्षात बदल म्हणून मराठी मनोरंजन क्षेत्रात वादारंभ झाला आहे. नव्या वर्षाची सुरुवातच वादाने झाली असल्याने पुढे काय वाढून ठेवले आहे… हा विचारही धडकी भरवणारा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut from the statement made on freedom veteran actor vikram gokhale aryan khan drugs case akp
First published on: 23-01-2022 at 00:02 IST