भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळे मापदंड मोडीत काढणाऱ्य अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. आज ह महानायक ८० वर्षांचा झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. असा महानायक शतकातून एकदाच होतो हे अगदी तंतोतंत खरं आहे. सगळ्यांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. चित्रपटसृष्टीतील मातब्बर लोकांनी बच्चन यांचा शुभेच्छा दिल्या आहेतच. शिवाय राजकीय नेत्यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष’ राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दळ ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज यांनी अमिताभ यांना एक पत्रच लिहिलं आहे आणि ते पत्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया माध्यमातून शेअर केलं आहे,

आणखी वाचा : “हे नाटक तुमच्या लायकीचं…” जेव्हा प्रेक्षकाच्या एका वाक्यानेच प्रशांत दामले यांना चपराक लगावली

नेमकं काय म्हणलेत राज ठाकरे जाणून घेऊयात –

“असं म्हणतात की प्रत्येक दशकाचा एक नेता असतो, एक अभिनेता असतो, एक आवाज असतो, पण जेव्हा एखादी व्यक्ति ५ दशकं अभिनय करत राहते आणि ह्या ५ दशकांत जवळजवळ संदर्भहीन होत नाही तेव्हा टी व्यक्ती महानायक असते. अशा एका महानायकाचा, अमिताभ बच्चन साहेबांचा आज वाढदिवस.

सिनेमा ही कला अद्भुत आहे, कारण एकतर समाजात सुरू असलेली घुसळण, सिनेमाच्या पडद्यावर चोखपणे प्रकट होऊ शकते. ती खूप वेगाने सर्वदूर पोहोचू शकते आणि तिला एक नायक असतो, ज्याच्यात समाज आपलं प्रतिबिंब पाहत असतो. बच्चन साहेब १९७० च्या दशकातील अस्वस्थतेचं आणि बंडखोरीचं सिनेमाच्या पडद्यावर उमटलेलं प्रतिबिंब होते. पुढे भारतीय सिनेमा बरा-वाईट-प्रगल्भ होत गेला तेव्हा, सिनेमाच्या प्रत्येक वळणावर बच्चन साहेब होते, आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर श्रेय-अपश्रेय पचवण्याची ताकद ते ठेऊन होते म्हणून ते महानायक ठरले.

ह्या माणसाने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, पण उतरांनाही हा माणूस खचला नाही कारण त्यांचं ‘अभिनय’ ह्या कलेवर कमालीचं प्रेम होतं, त्यामुळे सहजपणे त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनपद स्वीकारलं आणि ते उत्कृष्ट निभावलं की, आज २१ वर्ष झाली ह्या कार्यक्रमाला पण हा कार्यक्रम आज देखील लोकं बघतात तो फक्त बच्चनसाहेबांसाठी. ही लवचिकता आणि हे कामाप्रती प्रेम दुर्मिळ.

बच्चन साहेब आत कायम धगधगत असतात असं मला वाटत आलं, अर्थात ती धगधग पडद्यावर प्रकट होताना तिचं स्वरूप दशकांनुसार बदलत गेलं आणि ते प्रकटीकरण अधिक प्रगल्भ होत गेलं. अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड असंच कायम धगधगत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बच्चन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

– राज ठाकरे

राज ठाकरे हे याआधीही अमिताभ बच्चन यांच्याविषयी बऱ्याचदा आपुलकीने बोलले आहेत. त्यांचे आणि कलाकारांचे फार सलोख्याचे संबंध आहेत. राज ठाकरे यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. राज समर्थक आणि बच्चन यांच्या चाहत्यांनी हे ट्वीट शेअर करत अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra navnirman sena chief raj thackrey wishesh bollywood actor amitabh bachchan on twitter avn