“पोलिसांनी तातडीने मदत पाठवली म्हणून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न, फेसबुक पोस्टद्वारे सांगितला थरारक अनुभव

विशेष म्हणजे याद्वारे त्याने मुंबई पोलिसांचे आभारही मानले आहेत.

सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राला पोट धरुन हसवणाऱ्या या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील अनेक विनोदी कलाकारांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र याच कार्यक्रमातील एका विनोदी कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या कलाकाराने फेसबुक पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदी कलाकार पृथ्विक प्रताप याच्यासोबत ही संपूर्ण घटना घडली. शुक्रवारी २१ जानेवारीला पृथ्विक हा शूटींग संपल्यानंतर घरी जात होता. त्यावेळी त्याला एका रिक्षावाल्याने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस धावून आल्याने तो सुखरुप बचावला, असे त्याने या पोस्टमधून सांगितले आहे. तसेच हा प्रसंग नेमका कसा घडला याबाबत त्याने सविस्तर फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे याद्वारे त्याने मुंबई पोलिसांचे आभारही मानले आहेत.

पृथ्विक प्रताप याची फेसबुक पोस्ट

दिनांक २१/०१/२०२२, रात्री ९ च्या दरम्यान मी ग्रीन वॅली स्टुडिओज (काशिमीरा, मीरारोड) मधून शूटिंग आटपून घरी जाण्यास निघालो. नेमकी स्वतःची गाडी आज आणली नाही म्हणून ओला/उबेर बुक करण्याचा प्रयत्न करत होतो. पण नेटवर्क वीक असल्यामुळे ते काही घडेना… शेवटी वैतागून चालत स्टुडिओ गेटमधून बाहेर पडलो आणि एका रिक्षावाल्याला हात दाखवून विचारलं ‘ठाणे?’ त्यानेही तडक गाडी वळवली, मी बसलो, मीटर पडलं आणि आम्ही निघालो.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून त्याने गाडी कांदिवली दिशेला वळवली मी त्याला म्हणालो ‘थांब, आपल्याला ठाण्याला जायचंय गाडी घोडबंदर ने घे’ त्यावर त्याने ‘इधर से भी जाता है गाडी ठाणे को’ असं म्हणत त्याच्या मनाविरुद्ध रिक्षा fountain हॉटेलच्या दिशेने वळवली.

पण तो गाडी घोडबंदरच्या दिशेने नेण्याऐवजी वसईच्या दिशेने नेऊ लागला… मी पुन्हा त्याला म्हणालो ‘घोडबंदर मागे आहे, fountain च्या रस्त्याने जायचंय आपल्याला’ त्यावर तो चिडला आणि म्हणाला ‘मेरे को मत सिखा किधर क्या है, चुपचाप बैठ’. मी गाडी थांबव म्हणत असताना देखील तो वसईच्या दिशेने गाडी नेऊ लागला.

मी तडक ‘१००’ नंबर वर फोन केला. माझ्यासोबत घडणारा प्रकार पोलिसांना सांगितला, रिक्षाचा नंबर पोलिसांना सांगतोय हे कळताच त्या रिक्षावाल्याने रिक्षा पुन्हा fountain च्या दिशेने वळवली आणि म्हणाला ‘पोलीस को क्यू फोन कर रहे, गल्तीसे ये रस्ते पे गाडी डाला मैने’… आणि fountain हॉटेल जवळ त्याने गाडी थांबवली.

मी तडक गाडीतून उतरलो त्याचा फोटो काढला आणि त्याला म्हणालो कि ‘तेरा आयकार्ड, परमिट जो कूछ होगा दिखा’ त्यावर हुज्जत घालत तो म्हणाला ‘तू RTO वाला है क्या? तेरेको क्यू दिखाऊ, पोलीस को क्यू फोन लगाया? मेरी भी पुलिस में पहचान है, २० साल से है इस धंदे में, बोहोत देखे है पुलिस वाले’ मी त्याला शांतपणे म्हणालो ‘थांब आता जे पोलीस येतील त्यांच्याशी पण ओळख करून घे म्हणजे नंतर काठीची साईज किती हवी ते तू त्यांना सांगू शकशील’…. साधारण १० मिनिटे हुज्जत घातल्यानंतर त्याने तिथे येणारे काही पोलीस पाहिले आणि त्याने तिथून धूम ठोकली…
मी पोलिसांना फोन केल्यानंतर अगदीच १५ ते २० मिनिटांत माझ्या मदतीला ४ पोलिसवाले तिथे हजार होते… या सगळ्याच श्रेय ‘सिनिअर PI Vasant Labde यांना जातं, त्यांनी तातडीने मदत पाठवली म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो.

ही पोस्ट लिहिण्याचं कारण इतकचं कि माझे कित्येक मित्र मैत्रीण मीरारोड मध्येच शूटिंग करतात, बऱ्याचदा त्यांचं शूटिंग संपायला मध्यरात्र उलटते. त्यामुळे त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि महाराष्ट्र पोलिसांमुळे तितकाच निर्धास्त हि राहावं . #ThankYouMumbaiPolice, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“आम्ही काही नवा शोध लावलेला नाही…”, ‘गहराइयां’मधील इंटिमेट सीनबद्दल बोलताना दीपिका पदुकोण संतापली

दरम्यान पृथ्विक प्रतापची ही फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्याला अशा लोकांच्या नादी न लागण्याचा सल्लाही दिला आहे. अभिनेता पृथ्वीक प्रताप याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विनोदी पात्र साकारत असतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटातही त्याने काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap share facebook post talk about horrible incident happened after shooting nrp

Next Story
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बातमी ऐकून सुनील शेट्टी संतप्त, म्हणाले…
फोटो गॅलरी