मागच्या काही काळापासून काही ना काही कारणाने चर्चेत असलेला मराठी अभिनेता हार्दिक जोशी लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून चित्रपटतील मुख्य कलाकारांची नावंही आता समोर आली आहेत. या चित्रपटात हार्दिक जोशी पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असून त्याचा फर्स्ट लूक नुकताच या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला आहे. हार्दिक जोशीच्या या लूकवर त्याची होणार पत्नी अक्षया देवधरने कमेंट केली आहे.
‘हर हर महादेव’नंतर हार्दिक जोशी आता महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये मल्हारी लोखंडे ही ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर या भूमिकेच्या फर्स्ट लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिलं, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हार्दिकच्या या पोस्टरवर त्याची भावी पत्नी आणि अभिनेत्री अक्षया देवधरने कमेंट केली आहे.
अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे पोस्टर शेअर करत तिने हार्दिक जोशीचं अभिनंदन केलं आहे. तिने लिहिलं, “मनापासून अभिनंदन” याशिवाय तिने हार्दिक जोशीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. तिने कमेंटमध्ये, ‘भारी’ असं लिहून त्याबरोबर हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. अक्षयाची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
दरम्यान दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली होती. हा चित्रपट दिवाळी २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.