Sayali Sanjeev : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे अभिनेत्री सायली संजीव घराघरांत लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांत अभिनेत्रीने ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘हर हर महादेव’, ‘ओले आले’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय सायली अभिनयाच्या बरोबरीने राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण करत आहे. सध्या सायली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष पदी आहे.

सायली संजीव नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक करत, त्यांच्या पहिल्या भाषणाचा जीवनावर कसा प्रभाव पडला याविषयीचा अनुभव सांगितला आहे.

सायली संजीव म्हणाली, “मी कदाचित दहावीत असेन. त्याचदरम्यान राज साहेबांनी पक्ष स्थापन केला होता आणि त्यांची पहिली सभा झाली होती. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ती पहिली सभा अजूनही लक्षात असेल. दहावी-अकरावीचं ते वय असं असतं जेव्हा आपल्याला अनेक गोष्टी समजू लागतात. एखाद्याचे विचार प्रभावी वाटतात, आपल्याला प्रेरणा मिळते आणि राज साहेबांच्या त्या सभेचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यानंतर त्यांच्या नाशिकच्या सभेला मी स्वत: गेले होते.”

सायलीने पुढे सांगितलं, “मला राज साहेबांच्या प्रत्येक सभा आवडतात. पण, विशेषत: ज्यावेळी त्यांनी पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर ज्या काही सभा घेतल्या…त्या पाहिल्यावर माझ्यावर खूप प्रभाव पडला. आपण आज महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टींचा विचार केला तर, त्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आणि गरजेची आहे ती म्हणजे मराठी बोलणं. त्यावेळी मला आपल्या मातृभाषेतून संवाद साधणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव झाली. आज मी अभिमानाने सांगू शकते की, मी राज्यशास्त्राचं ( MA ) शिक्षण पूर्ण मराठीत पूर्ण करतेय. मी इंग्रजीत प्रवेश घेतला नाही. माझा अभ्यास, माझी प्रश्न-उत्तरं, माझी पुस्तकं या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये आहेत.”

“दिल्लीच्या विद्यापीठात राज्यशास्त्राचं शिक्षण मराठीत मिळणार नव्हतं. त्यांच्याकडे तो विषय इंग्रजीत शिकवला जाणार होता. त्यामुळे मी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला, जेणेकरून मला मराठीतून हा अभ्यास करता येईल. साहेबांच्या त्या एका भाषणाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यानंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मी पक्षात सहभाग घेतला, नंतर त्यांची सभासद झाले आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची उपाध्यक्ष आहे.” असं सायली संजीवने सांगितलं.

आपल्या मातृभाषेविषयी सायली सांगते, “आज मला जिथे-जिथे शक्य आहे तिथे मी मराठीत बोलते. ज्याठिकाणी मला अजिबातच शक्य नाहीये फक्त तिथेच मी इंग्रजी बोलते. पण, मला खरंच वाटतं की, ज्याठिकाणी आपण राहतो तिथली भाषा, म्हणजेच आपली मातृभाषा बोलणं यासारखी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही.”

“राज साहेबांबद्दल अजून एक गोष्ट सांगेन ती म्हणजे, त्यांचं वाचन खूप सखोल आहे. आता आपण त्यांच्याबरोबर सिनेविश्वातील गप्पा जरी मारल्या तरी, त्यांना अतिशय छोट्यातल्या छोट्या गोष्टीही माहिती असतात. सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे…ते स्वत: व्यंगचित्रकार असल्याने त्यांना कलेसंदर्भातील भरपूर गोष्टी माहिती आहेत. पण, इतकंच नव्हे तर खेळ किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दल सुद्धा ते सहज बोलू शकतात इतका त्यांचा विलक्षण अभ्यास आहे. त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला.” असं सायली संजीवने सांगितलं.