बॉलिवूडमधूील सध्याची आघाडीची डान्सर म्हणजे नोरा फतेही. ‘दिलबर’ या गाण्याने नोराला ओळख मिळाली आणि त्यानंतर तिच्या दमदार डान्सने तिने चाहत्यांना घायाळ केलं. आपल्या डान्सच्या जादूने नोराने चाहत्यांनी मनं जिंकली असली तरी नोराला अभिनयात आपली ओळख निर्माण करायची आहे. जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ सिनेमात नोराने एक छोटीशी भूमिका साकारली होती. शिवाय या सिनेमातील तिचं ‘ओ साकी साकी’ हे गाणं देखील प्रचंड गाजलं होतं.
तसचं रेमो डिसुजाच्या ‘एबीसीडी-३’ आणि सलमानच्या ‘भारत’ या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या होत्या. मात्र या भूमिका फार मोठया नव्हत्या. तर नोराला टायगर श्रॉफच्या ‘गणपथ’ या आगामी सिनेमासाठी देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र नोराने ही ऑफर नाकारली आहे. ईटीटाइम्सच्या वृत्तानुसार नोराने ही भूमिका अगदी छोटी असल्याने नाकारली आहे. नोराला अपेक्षित अशी ही भूमिका नसल्याने तिने नकार दिला.
दरम्यान त्यानंतर आता ‘गणपथ’ सिनेमामध्ये टायगर श्रॉफ अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करत असून २०२२ सालात हा सिनेमा प्रदर्शित केला आहे. ‘हिरोपंती’ या सिनेमातून टायगर आणि क्रितीने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. त्यानंतर आठ वर्षांनी दोघं पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत.
दरम्यान नोरा लवकरच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारतेय. या सिनेमात अजय देवगण, संजय जत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.