Koffee With Karan 8: ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. पहिल्याच भागापासून हा सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकायला सुरुवात झाली आहे. पहिल्या भागात दीपिका पदूकोण व रणवीर सिंह यांनी हजेरी लावली. यावेळी आपल्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा करताना दीपिकाने केलेलं एक वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि त्यावरून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही करायला सुरू केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता करण जोहर त्याच्या पुढील भागात कोणाला बोलवणार याची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी देओल ‘कॉफी विथ करण’च्या पुढच्या भागात दिसणार ही चर्चा होती. नुकताच हॉटस्टारच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘कॉफी विथ करण ८’च्या पुढील भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सनी देओल आणि बॉबी देओल या दोघांनी या दुसऱ्या भागात हजेरी लावली आहे.

आणखी वाचा : तोच दिवस, तेच वय व तीच परिस्थिती; नेटकऱ्यांनी सांगितलं मॅथ्यू पेरी व श्रीदेवी यांच्या मृत्यूमधील साम्य

हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. बऱ्याच वर्षांनी सनी देओल आणि बॉबी देओल यांनी एकत्र या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या भागात करणने ‘गदर २’चे आणि बॉबीच्या आगामी प्रोजेक्टचे तोंडभरून कौतुक केले. याबरोबरच या दोघांनीही या भागात अत्यंत मानमोकळेपणाने गप्पा मारल्या. या भागात ‘गदर २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांच्यातील किसिंग सीन अशा वेगवेगळ्या विषयांवर अगदी खुसखुशीत गप्पा रंगल्या.

आपल्या वडिलांच्या किसिंग सीनबद्दल नेमकं काय वाटलं आणि सनी देओल याला टेडी बेअर का आवडतात अशा धमाल प्रश्नांची उत्तरंही याच भागात मिळाली. येत्या गुरुवारी हा भाग ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सनी देओल आता आमिर खान व राजकुमार संतोषी यांच्याबरोबर एका चित्रपटात काम करणार आहे याबरोबरच सनी नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर बॉबी देओल त्याच्या ‘अॅनिमल’मधल्या हटके अवतारामुळे चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol and bobby deol on the next episode of koffee with karan 8 avn