बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक हिट सिनेमे देऊन वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी अभिनेते राजकुमार राव याला ओळखलं जातं. चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासोबतच आता त्याने आपल्या कवी अंदाजातून सुद्धा आपल्या फॅन्सचं मन जिंकलंय. करोनाच्या या संकट काळात करोनाग्रस्त रुग्णांची काळजी घेताना बरेच लोक स्वतः या प्राणघातक विषाणूचा बळी ठरले. देशातील अनेक डॉक्टर, परिचारिका, पोलीस आणि इतर कोरोना वॉरियर्स लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा करोना वॉरियर्सना अभिनेता राजकुमार राव याने आपल्या खास कवितेतून अनोखी सलामी दिलीय.
गेल्या एक वर्षापासून देशातील अनेक करोना वॉरियर्स लागोपाठ न थकता करोना रूग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. अशा सर्व करोना वॉरियर्सना सलाम करण्यासाठी अभिनेता राजकुमार राव याने एक खास कविता शेअर केली आहे. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही कविता शेअर केली आहे. ही कविता शेअर करताना त्याने #RukJaanaNahi… हा हॅशटॅग वापरलाय. सोबतच एक पोस्ट देखील त्याने लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “मी सोशल मीडियावर दररोज अशा व्यक्तींना भेटतो जे करोना काळात दुसऱ्या व्यक्तींचा दिवस आणखी उज्ज्वल करण्यासाठी धावपळ करतात…तेच आजचे खरे हिरो आहेत…सध्याच्या कठिण काळात सुद्धा लोकांमध्ये जगण्याची आशा निर्माण करणाऱ्या त्या करोना योद्ध्यांना माझ्याकडून आणि स्पोटीफायकडून सलाम…स्वानंद किरकिरे यांची अप्रतिम कविता…आणि ही फक्त सुरवात आहे…#RukJaanaNahi… ही सध्याच्या कठिण काळात लोकांसाठी धडपडणाऱ्या त्या निस्वार्थ सुपरहिरोंची ओळख व्हावी यासाठी स्पोटीफायने सुरू केलेली मोहीम आहे.”
या पोस्टमध्ये आणखी पुढे लिहिताना अभिनेता राजकुमार राव म्हणाला, “प्रत्येक आठवड्याला मी सामान्य लोकांना भेटणार आहे जे त्यांच्या #StoriesOfHope विलक्षण कहाण्या सांगणार आहेत. सध्याच्या कठिण काळात त्यांनी दिलेलं योगदान हे कायम लक्षात राहणारे आहेत.”
देशात करोनाच्या महामारीत गरजू लोकांना मदत करणाऱ्या आणि करोना रूग्णांच्या सेवेत असणाऱ्या करोना योद्ध्यांची ओळख लोकांना व्हावी यासाठी स्पोटीफायकडून ‘रूक जाना नहीं’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत काही निवडक व्हिडीओ आणि ऑडीओ सीरिज चालवली जाणार आहे. यातील ८ एपिसोडमध्ये करोना काळात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या योद्ध्यांची ओळख करून देणारे व्हिडीओज दाखवले जाणार आहेत. या सीरिजचं सुत्रसंचालन अभिनेता राजकुमार राव करणार आहे. या सीरिजमधली पहिली ऑडिओ सीरिज अभिनेता राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. सुप्रसिद्ध गीतकार स्वानंत किरकिरे यांनी लिहिलेली ही कविता आहे.
अभिनेता राजकुमार रावने शेअर केलेली ही कविता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. अभिनेता राजकुमारने ही कविता शेअर केल्यानंतर कवितेला अवघ्या काही तासांतच अडीच लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसंच सध्याच्या कठिण काळात त्याने घेतलेल्या पुढाकाराबाबत त्याचे फॅन्स त्याचं कौतूक देखील करताना दिसून येत आहेत.