Karisma Kapoor-Abhishek Bachchan Break Up Reason : ९० च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सिनेमांत एकापेक्षा एक महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटीदेखील करिश्मा कपूर हिच्यावर फिदा होते. बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करीत असताना करिश्माचं नाव अनेक सेलिब्रिटींबरोबर जोडण्यात आलं; पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

निर्माता-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी अक्षय कुमार, बॉबी देओल यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक स्टार्सबरोबर काम केले आहे. आता अलीकडेच ते विकी लालवाणी यांना दिलेल्या मुलाखतीत करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या ब्रेकअपबद्दल बोलले आहेत. त्याबरोबरच त्यांनी अभिनेत्री आणि दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या लग्न आणि घटस्फोटावरही आपले मत मांडले आहे.

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचाही साखरपुडा झाला होता; पण नंतर त्यांचे नाते अचानक तुटले. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. या जोडप्याने २००२ मध्ये आलेल्या ‘हाँ मैंने भी प्यार किया’ या चित्रपटातही एकत्र काम केले होते. आता या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी अभिषेक आणि करिश्मा कपूर यांच्या ब्रेकअपबद्दल बोलले आहे.

करिश्मा कपूर एक उत्तम अभिनेत्री आहे : सुनील दर्शन

करिश्मा कपूरने १९९१ मध्ये ‘प्रेम गद्दी’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जेव्हा चित्रपट निर्मात्याला विचारण्यात आले की, करिश्मा एक अभिनेत्री म्हणून कशी होती, तेव्हा ते म्हणाले, “मी करिश्माबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा ती नवीन होती. मला वाटते की, मी २००० मध्ये जुही चावलाबरोबर काम करायला सुरुवात केली होती. काही कारणांमुळे जुही चावला तो चित्रपट करू शकली नाही आणि आम्हाला तिच्या जागी करिश्माला घ्यावे लागले. मग मी माझे सुरुवातीचे काही शूटिंग रद्द केले आणि करिश्माबरोबर काम करायला सुरुवात केली. करिश्माबरोबर काम करण्याचा अनुभव आरामदायी होता.”

त्यानंतर जेव्हा सुनील दर्शन यांना करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, करिश्मा आणि संजय कपूरची बहीण बालपणापासूनच खूप चांगले मित्र होते. पुढे त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले की, हे लग्न पहिल्या दिवसापासूनच दुःखद होते. सुनील म्हणाले, “मला वाटते की, हा अचानक घेतलेला निर्णय होता. ते खरोखर खूप दुःखद होते. कारण- ती एक चांगली मुलगी आहे.”

ते पुढे म्हणाले, “काही गोष्टी तिच्या नशिबात होत्या. तिच्या आयुष्यात एक वाईट वळण आले आणि जेव्हा तिचे त्याच्याशी लग्न झाले तेव्हा तिला गृहिणी व्हायचे होते. ती शनिवारी संध्याकाळी गोल्फ खेळायला जाणाऱ्या प्रकारची व्यक्ती नव्हती. तिला तिच्या कुटुंबाबरोबर घरी वेळ घालवायचा होता. ती एक घरगुती मुलगी आहे. ती खूप छान मुलगी आहे.”

अभिषेक बच्चनबरोबरच्या ब्रेकअपवर काय म्हणाले?

करिश्मा आणि अभिषेकच्या रिलेशनशिपबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, “दोघांमध्ये केमिस्ट्री तर होतीच, तुम्ही ‘हाँ मैंने भी प्यार किया’ बघायला हवा. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री त्यांच्या खऱ्या आयुष्यातील नात्याला प्रतिबिंबित करते. ते पुढे म्हणाले की, त्यांच्यातील संबंधांच्या कमतरतेमुळे ब्रेकअप झाले नाही, तर ते बाह्य दबावामुळे झाले. ते पुढे म्हणाले, “कधी कधी त्यांच्या अंतर्गत वातावरणाबाहेरील गोष्टी समस्या निर्माण करतात आणि संपूर्ण परिस्थिती बिघडवतात. मला वाटले की, तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. मला अजूनही वाटते की, करिश्मा आणि करीना, मी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहीन.”

ऑक्टोबर २००२ मध्ये जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या पार्टीत करिश्मा आणि अभिषेक यांच्या साखरपुड्याची जाहीर घोषणा केली होती. जानेवारी २००३ पर्यंत कोणत्याही विशिष्ट कारणाशिवायही साखरपुडा मोडला गेला, ज्यामुळे मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती.