Amitabh Bachchan Sells 2 Luxury Apartments For ₹12 Crore : बिग बी अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते तर आहेच; परंतु ते बॉलीवूडमधील श्रीमंत कलाकारांपैकीसुद्धा एक आहेत. त्यांनी नुकतीच त्यांची दोन आलिशान अपार्टमेंट कोट्यवधीच्या किमतीला विकली.

अमिताभ बच्चन यांचा जुहू येथे आलिशान बंगला आहे. तर त्यांची मुंबईतील गोरेगाव परिसरातील दोन आलिशान अपार्टमेंट त्यांनी नुकतीच विकली आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार अमिताभ यांनी १३ वर्षांपूर्वीचे त्यांची गोरेगाव येथील २ आलिशान अपार्टमेंट तब्बल १२ कोटींना विकली आहेत.

अमिताभ बच्चन यांना झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा फायदा

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट ८.१२ कोटींना खरेदी केले होते आणि आता त्यांनी ही दोन अपार्टमेंट तब्बल १२ कोटींना विकली आहेत. त्यामुळे यातून त्यांना ४७ टक्क्यांनी फायदा झाला आहे.म्हणजेच त्यांना जवळपास ३.८ कोटींचा फायदा झाला.

अमिताभ यांची ही दोन्ही अपार्टमेंट गोरेगावातील Oberoi exquisite मधील ४७ व्या मजल्यावर आहेत. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार त्यांचं एक अपार्टमेंट १,८२९ स्क्वेअर फूट इतक्या आकारमानाचे आहे. त्यांनी हे अपार्टमेंट सहा कोटींना विकले; तर दुसरे अपार्टमेंटही त्यांनी सहा कोटींनाच विकले आहे.

अमिताभ बच्चन यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये अलिबाग येथे तीन प्लॉट १० कोटींना खरेदी केले होते. मुंबई आणि अलिबाग येथील प्रॉपर्टीव्यतिरिक्त त्यांनी अयोध्येतही गुंतवणूक केली आहे. त्यांनी या शहरात काही वर्षांमध्ये काही प्लॉट खरेदी केले आहेत.

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन हे बच्चन कुटुंबातील सदस्य बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत. चित्रपट, जाहिराती, ब्रँड्सबरोबरचे करार आणि इतर गोष्टींतून त्यांना पैसे मिळतात.

दरम्यान, अमिताभ बच्चन येत्या काळात ‘सेक्शन ८४’ या नवीन प्रॉजेक्टमधून झळकणार आहेत. त्यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री निम्रत कौर, डियाना पेंटी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.