छोट्या पडद्यावरील आघाडीचा अभिनेता, मालिकेतील अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. दोघेही एकत्र राहू लागले. ती त्याची खूप काळजी घ्यायची. पण तरीही त्याने तिची फसवणूक केली. मग त्याच्या आयुष्यात एक महिला आली, जिने त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले आणि त्याला मुंबई सोडून जावं लागलं. या अभिनेत्याने सलमान खान, शाहरुख खान, ऐश्वर्या रायबरोबर काम केलंय. या अभिनेत्याचं नाव एजाज खान.
एजाजचा जन्म हैदराबादचा, पण तो मुंबईतील चेंबूरमध्ये वाढला. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने बालपण सामान्य नव्हतं. त्याचं पालन-पोषण वडिलांनी केलं. आयुष्य सुंदर होतं, पण विभक्त कुटुंबामुळे चढ-उतार आले, असं एजाजने सांगितलं. “बालपण फार चांगलं नव्हतं. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने आम्हाला कमी वयातच आत्मनिर्भर व्हावं लागलं,” असं एजाजने स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
“माझे वडील खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला शिस्त लावली. ते खूप मोकळ्या विचारांचे होते, पण आम्ही धार्मिक असू याची त्यांनी खात्री केली,” असं एजाज म्हणाला. एजाज शाळेत असताना त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्याला समजलं की त्याला एक बहीण आहे. ती हैदराबादमध्ये राहायची. बहिणीला भेटायला त्याला १३ वर्षे लागली. पुढे तिचा मोठा भाऊ असल्याच्या सर्व जबाबदाऱ्या एजाजने पार पाडल्या. तिचं लग्नदेखील लावून दिलं.
दुखापतीमुळे २-३ वर्षे करू शकला नाही काम
एजाज गणेश हेगडे डान्स ग्रुपमध्ये सहभागी झाला. ४-५ वर्षे जगभर फिरला. २३ व्या वर्षी तो बॅकग्राउंड डान्सर झाला. मग एजाजने सलमान खान, शाहरुख खानबरोबर काम केलं. २००० साली एजाजने शाहरुख खानबरोबर एक शो केला होता. तिथे जरीना मेहता व केन घोष यांनी एजाजला पाहिलं. त्याला ‘इश्क विश्क प्यार व्यार’ व ‘सरहदें’पैकी एक सिनेमा निवडायचा होता, पण तो दोन्ही सिनेमे करू शकला नाही. सलमानबरोबर काम केल्यानंतर त्याला २००२ मध्ये सोहेल खानने ‘मैंने दिल तुझको दिया’मध्ये एक भमिका दिली. शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली, परिणामी तो २-३ वर्षे काम करू शकला नाही.
एजाज खानने ऐश्वर्या रायबरोबर केलं काम
दुखापतीतून सावरल्यावर एजाजने म्युझिक व्हिडीओ व चित्रपट केले. त्याने २००३ साली ऐश्वर्या रायसह ‘तुझे आज मैंने जो देखा’ गाणं केलं. मग त्याला एकता कपूरने मालिका ऑफर केली. “मी एकताला भेटलो तिने मला १० मिनिटांत तीन वर्षांच्या करारावर सही करायला सांगितलं,” असं एजाज सांगतो. त्याने ‘काव्यांजली’मध्ये काम केलं आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अनीता हसनंदानी देखील होती.
अनिता व एजाज पडले प्रेमात
मालिकेदरम्यान एजाज व अनिता प्रेमात पडले. “हे माझं दुसरं अफेअर होतं. मी बालाजीमध्ये काम करत होतो. ती माझ्याबरोबर होती, माझी काळजी घेत होती. मी उठून टिफीन घेऊन कामावर जायचो. मी शूटिंगवरून परतायचो, तेव्हा माझं जेवण तयार असायचं. मी आराम करून पुन्हा कामावर जायचो. पण मी तिची फसवणूक केली. मी माझी चूक मान्य केली आणि नातं सुधारण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मग आम्ही वेगळे झालो. मला आयुष्यात या गोष्टीचा प्रचंड पश्चात्ताप आहे,” असं एजाज म्हणाला.
टीव्हीनंतर एजाज खान चित्रपट करू लागला. त्याचा एक चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. दुसरा २००८ मध्ये रिलीज झाला. त्याने ‘तनु वेड्स मनु’मध्ये काम केलं होतं. पण प्रमोशनआधी एजाजच्या आयुष्यात एक धक्कादायक प्रसंग घडला. एजाज एका महिलेला डेट करत होता, तिने एजाजवर बलात्काराचे आरोप केले, त्यामुळे एजाजला अंडरग्राउंड व्हावं लागलं होतं. “एक मोठ्या सिरियस अफेअरनंतर मी काही काळ सिंगल होतो, मग पार्टीत मी कुणालातरी भेटलो. काही अडचणींमुळे ती माझ्या घरी राहू लागली. आमचं अफेअर नुकतंच सुरू झालं होतं. एका महिन्यातच मला जाणवलं की सगळं आलबेल नाही. मी तिला सोबत राहण्यास नकार दिल्याने ती भडकली आणि माझ्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली.
अन्नासाठी घासावी लागली भांडी
“तनु वेड्स मनुनंतर मी गायब झालो. माझ्या वैयक्तिक आयुष्यात अशी घटना घडली की मला फोन बंद करावे लागले. मी सहा महिने अंडरग्राउंड झालो होतो. प्रकरण कुटुंबियांपर्यंत पोहोचलं आणि मला दोन महिन्यांसाठी मुंबई सोडावी लागली. मला जेवण मिळावं यासाठी भांडी घासावी लागत होती. हा प्रचंड कठीण काळ होता,” असं एजाज खानने सांगितलं.
एजाज खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘जवान’मध्ये नकारात्मक भूमिकेत होता. त्याचबरोबर त्याने काही वेब सीरिजमध्येही काम केलंय.
