मुंबई : बेस्ट उपक्रमात खासगीकरण सुरू असून, भाडेतत्त्वावरील बस चालवण्यात येत आहेत. त्यामुळे बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली आहे. बेस्टचा प्रवास असुरक्षित झाल्याने अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत बेस्ट बसच्या ८३४ अपघातात ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट भाडेवाढीविरोधात शुक्रवारी वडाळा बेस्ट आगार येथे प्रवाशांनी निदर्शने केली. बेस्ट वाचविण्यासाठी मुंबईकरांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बेस्टने कंत्राटी पद्धतीने भाडेतत्वावर बसगाड्या घेतल्या आहेत. बेस्टने भाडेतत्वाच्या बसवर अवलंबून राहण्याऐवजी ताफ्यात स्वमालकीच्या किमान सहा हजार बसगाड्या समाविष्ट कराव्या आणि मुंबईकरांना सेवा द्यावी, अलिकडेच करण्यात आलेली बेस्ट भाडेवाढ मागे घ्यावी, आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले.

विविध १२ संघटनांनी शुक्रवारी वडाळा बस आगाराबाहेर निदर्शने केली. यावेळी भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, बस आगारांवर कमाई करण्याचा प्रस्ताव रद्द करणे, मुंबई पालिका आयुक्तांनी पालिकेकडून बेस्टला ९ हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्याच्या फेब्रुवारी २०२४ च्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि बेस्टला किमान सहा हजार बसच्या स्वमालकीच्या बस आणि भाडेतत्त्वावरील बस सेवा बंद करण्यात यावी, असे मत ‘आमची मुंबई आमची बेस्ट’चे संयोजक हुसेन इंदोरवाला यांनी व्यक्त केले.