Milind Deora : शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात मुंबईच्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मोकळ्या जागांवर होर्डिंग उभारणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत पत्र लिहिलं आहे. या पत्राला खासदार मिलिंद देवरा ( Milind Deora ) यांनी उत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी काय पत्र लिहिलं?

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई महापालिकेने हाजी अली आणि अमरसन्स पार्क, ब्रीच कँडीजवळच्या कोस्टल रोड गार्डनच्या जागेवर असलेल्या मोकळ्या जागेवर होर्डिंग्ज उभारण्याची योजना आखली आहे. कोस्टल रोडलगत त्यासाठी चार पाच मोकळ्या जागा तयार करण्यात आल्या आहेत. या जागा नागरिकांसाठी खुल्या होण्याआधीच ठेकेदारांना दिल्या आहेत. याला आमचा विरोध आहे, तसंच होर्डिंग्जनाही आमचा विरोध असणार आहे. आमच्या मूळ ड्रीम प्रोजेक्टमध्ये होर्डिंगसाठी जागा नाही. यामुळे आमचा मुंबईकरांना हा शब्द आहे की यावर्षी आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही होर्डिंग्ज उतरवू आणि आमचे शहर उद्ध्वस्त करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना शिक्षा करु. हे पत्र आदित्य ठाकरेंनी लिहिलं आहे. यानंतर मिलिंद देवरांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Aditya Thackeray in Pune: “गुजरातच्या आर्किटेक्टला पुणे कळतंय का?” आदित्य ठाकरेंचा सवाल

मिलिंद देवरांची पोस्ट काय?

मुंबई मनपा आयुक्तांना अशा प्रकारची प्रेमपत्रं लिहिण्यापेक्षा मुंबईच्या विकासाचा खरा अजेंडा सादर करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा वेगाने विकास होत आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव प्रगती केली जाते आहे. तुमची सत्ता असताना मेट्रोसारखे मोठे प्रकल्प रखडले होते. त्यानंतर महायुतीने ते मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत हे विसरु नका.

मिलिंद देवरा म्हणाले तुम्ही तुमच्या वरळीवर लक्ष केंद्रीत करा

मुंबईला आता महालक्ष्मी रेसकोर्स येथे सर्वात मोठे सार्वजनिक उद्यान मिळणार आहे. ते तुमच्या २०१३ च्या थीम पार्क कल्पनेपेक्षा चांगले आहे. तुम्ही तुमच्या वरळीवर लक्ष केंद्रीत करा. त्या ठिकाणी मी शनिवारी तुमची अलोकप्रियता आम्हाला पाहण्यास मिळाली. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत तुमच्या उमेदवार केवळ ६ हजार ५०० मतांनी आघाडीवर होता, असं म्हणत खासदार मिलिंद देवरांनी ( Milind Deora ) आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रावर मिलिंद देवरांनी उत्तर दिलं आहे.

आता यावर आदित्य ठाकरे मिलिंद देवरांना ( Milind Deora ) काही बोलणार का? काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.