आम आदमी पार्टीन दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दिल्ली, पंजाबनंतर आता आम आदमी पार्टीचं गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीवर लक्ष असणार आहे. यासाठी पक्षानं रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सत्तेसाठी रणनिती आखली जात आहे. त्याचबरोबर अशियातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिका निवडणुकाचाही विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी एनडीटीव्हीशी बोलताना आम आदमी पार्टीचे नेते अक्षय मराठे म्हणाले की, ‘आम्ही गुजरात आणि हिमाचल प्रदेशात नक्कीच निवडणूक लढवणार आहोत. ही दोन राज्ये आमच्या रडारवर असून पक्ष कार्यकर्त्यांना या राज्यांमध्ये पाठवत आहे. त्याचा निश्चितच मोठा परिणाम होईल.” आपचे नेते अक्षय मराठे पुढे म्हणाले की, “अनेक दशकांपासून भारतातील जनतेला दोनच पक्षांपैकी एकाची निवड करायची होती. या दोन्ही पक्षांनी त्याच्यासाठी काम केलेले नाही. जनतेला प्रथमच पर्याय दिसत आहे. लोकांना बदल हवा आहे.”

दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेबाबतही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत अनेक गैरव्यवहाराची प्रकरणं समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत निवडणुकीसाठी जोर लावावा, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. लोकांना सक्षम पर्याय हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. पंजाबमधील विजयानंतर मुंबईतही जल्लोष करण्यात आला. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, असं चित्र होतं. आम आदमी पार्टी मुंबई या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याचं पोस्टर देण्यात झलकवण्यात आलं आहे. दिल्ली बदली, अब मुंबई की बारी! असं त्यावर लिहिण्यात आलं आहे.

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आम आदमी पार्टी कशी रणनिती आखते, याकडे कार्यकर्त्यांचा लक्ष लागून आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After punjab aap focus on these two states and bmc rmt