मुंबई : हवाई सेविकेला (एअर होस्टेस) समारंभात मद्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लंडनस्थित हवाई कंपनीच्या एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आली आहे. तो हाँगकाँगला पळून जाण्याच्या तयारीत होता. सहार विमानतळ पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

मैत्री, पार्टी आणि अत्याचार

पीडित महिला २३ वर्षांची असून ती लंडनस्थित एका विमान कंपनीत हवाई सेविका (एअर होस्टेस) म्हणून काम करते. तिने ठाणे जिल्ह्यातील नवघर पोलीस ठाण्यात तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ती ज्या कंपनीत काम करते. त्या कंपनीमार्फत ती २९ जून रोजी लंडनला गेली होती. त्यावेळी विमानात असलेल्या २५ वर्षीय कर्मचाऱ्याशी तिची ओळख झाली. दोघेही एकाच विमानाने लंडनला गेले होते. तेथे मुक्काम केल्यानंतर ते दोघे मुंबईला परतले.

त्यानंतर आरोपीने तिला एका पार्टीला नेले आणि हेतुपरस्सर भरपूर मद्य पिण्यास भाग पाडले. ती नशेच्या अंमलात असताना आरोपीने तिला ॲप आधारीत खाजगी टॅक्सीतून मिरा रोड येथील आपल्या घरी नेले. तेव्हा पहाटेचे पाऊणे तीन वाजले होते. पीडित हवाई सेविका नशेत होती. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. नशेत असल्याने मी प्रतिकार करू शकले नव्हते, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

तक्रार न करण्याबाबत धमकावले

या घटनेतर पीडित हवाई सेविकेला मानसिक धक्का बसला होता. आरोपीने तिला तक्रार केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली होती. पीडित हवाई सेविका कामानिमित्त परदेशात गेली होती. मात्र तेथून परतल्यानंतर तिने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी आरोपी विरोधात केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) तसेच धमकावल्याप्रकऱणी कलम ३५१(१) आणि ३५२ अन्वये गुन्हे दाखल केला आहे.

हाँगकाँगला पळून जाताना अटक

गुन्हा दाखल होताच आरोपी कायमस्वरूपी भारत सोडून हॉंगकॉंगमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला हाँगकाँगमध्ये दुसऱ्या विमान कंपनीत नोकरी लागली होती. त्याचा व्हिसाही त्याने घेतला होता. नवघर पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचा दक्षता विभाग आणि सहार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला विमानतळावरूनच अटक केली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी हे करत आहेत.