मुंबई : सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपशावरील कारवाई थांबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दूरध्वनी करून आदेश दिल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर पवार यांनी शुक्रवारी सारवासारव केली. यासंदर्भात आपल्याला कार्यकर्त्यांनी दूरध्वनी केल्याने परिस्थिती बिघडू नये, यादृष्टीने दूरध्वनी केल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी केले.
‘माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता. त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी याची काळजी घेण्याचा होता. पोलीस दल तसेच धैर्य आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हे महत्त्वाचे आहे. वाळू, माती, मुरुम उपशाच्या बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध आहे’, असा खुलासा पवार यांनी केला.
आर्थिक शिस्त कोणासाठी? राऊत
मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून बेकायदा खाणकाम चालू असून पवार त्यांना संरक्षण देत आहेत. आता एका आयपीएस महिला अधिकाऱ्याला पक्षातील चोरांना संरक्षण देण्यासाठी पवार दम देत आहेत. अजित पवार तुमची आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? असा सवाल शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) संजय राऊत यांनी केला.
सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही- वडेट्टीवर महायुती सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही. सरकार हे सेवक असते पण महायुतीचे सरकार मालक असल्यासारखे वागते. यांना सत्तेचा माज चढला आहेे. त्यातून आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्याला पवार दमबाजी करीत आहेत, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
सुनील तटकरेंकडून सारवासारव
विरोधकांकडून पवारांवर टीका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सारवासारव केली. पवार नेहमीच महिला अधिकाऱ्यांचा सन्मान जपत आले असून त्यांचा हेतू अधिकारी महिलेस दमबाजी करण्याचा नव्हता, असे तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ‘पवार यांची भाषा कडक असल्याने ती दमबाजी असल्यासारखे वाटते’ असा दावा केला.