मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने शहरातील विविध वारसा वास्तूंचा समृद्ध इतिहास आणि स्थापत्यवैशिष्ट्ये उलगडणारे ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’ कॉफी टेबल बुक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या कोफी टेबल बुकमधून मुंबईच्या पुरातन वारशाची समृद्धता उलगडणार असून त्यात मुंबईतील लेणी, किल्ले तसेच गॉथिक, निओ-गॉथिक, आर्ट डेको, इंडो-सारसॅनिक आणि निओ-क्लासिकल अशा विविध स्थापत्यशैलींतील ७५ पुरातन वारसा वास्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कॉफी टेबल बुक केवळ एका महिन्यात तयार करण्यात आले आहे.
मुंबई शहरात संस्कृती, परंपरा आणि स्मृतींचे दर्शन घडते. मुंबईचे खरे सौंदर्य शतकानुशतकांच्या पुरातन वारसा आणि भव्य वास्तुंमध्ये दडलेले आहे. अशाच वैभवशाली पुरातन वारसा वास्तूंची सचित्र माहिती ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’ या कॉफी टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पुस्तकात महानगरपालिकेने मुंबईतील ऐतिहासिक वारसा वास्तू नव्याने समोर आणल्या असून मुंबईच्या वैभवशाली पुरातन वारसा वास्तूंची समृद्धता उलगडण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, महाराष्ट्र शासनाचा ‘सेवा पंधरवडा २०२५’ व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकास भी, विरासत भी’ या संकल्पनेनुसार, महानगरपालिकेने ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’ या कॉफी टेबल बुकची निर्मिती केली आहे. या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय येथे नुकतेच पार पडले. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त चंदा जाधव, उप आयुक्त अजितकुमार आंबी, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त व मानद संचालक तस्नीम मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने संपादित केलेल्या या पुस्तकात मुंबईतील लेणी, किल्ले तसेच गॉथिक, निओ-गॉथिक, आर्ट डेको, इंडो-सारसॅनिक, निओ-क्लासिकल आदी स्थापत्यशैलींतील वारसा वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा वास्तू, वसाहतकालीन व शासकीय वास्तू, वैद्यकीय वारसा वास्तू, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा वास्तू, किल्ले व दुर्ग वारसा स्थळे, हरित वारसा स्थळे, स्मारके, कारंजे व चौक, धार्मिक वारसा वास्तू आदींची माहिती आणि छायाचित्रे यात संकलित करण्यात आली आहेत. त्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी आणि व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको वास्तू समूह यांचाही समावेश आहे.
केवळ एका महिन्यात तयार करण्यात आलेल्या या कॉफी टेबल बुकसाठी पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधीक्षक अभिजित आंबेकर, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय आढाव आदींनी मोलाचे योगदान दिले आहे.
मुंबई महानगरात इतिहास आणि आधुनिकतेचा संगम आहे. ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’ या कॉफी टेबल बुकमधून मुंबईच्या गौरवशाली वारशाची ओळख जगासमोर, देशासमोर ठळकपणे मांडली जाईल. ‘हेरिटेज डिप्लोमसी’च्या दृष्टिकोनातूनही या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. मुंबईवर, येथील वास्तुंवर आणि मुंबईच्या इतिहासावर ज्यांचे प्रेम आहे, ती व्यक्ती या पुस्तकापासून वेगळी राहूच शकणार नाही. मुंबईप्रेमी, इतिहास व वास्तुकलेचे अभ्यासक तसेच जगभरातून मुंबईनगरीकडे आकर्षित होणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक स्मरणीय संग्रह ठरेल’.- ॲड. आशिष शेलार, (राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री व मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री)
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला संस्कृतीसह आधुनिक कालखंडात नेण्याची रुपरेषा आखली आहे. या पार्श्वभूमीवर, हे कॉफी टेबल बुक मुंबईच्या संस्कृतीचा, वास्तुंचा वारसा पुढे नेणारे आहे. परंपरा आणि संस्कृतीला अनुसरुन नसलेला विकास तकलादू असतो. इतिहासाच्या जाणीवेतून शाश्वत विकास साध्य होतो. मुंबईतील वारशाचे ऐतिहासिक महत्त्व या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.-डॉ. भूषण गगराणी, (महानगरपालिका आयुक्त व प्रशासक)