मुंबई : पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री निलेश घायवळ यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आला. खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याने मंत्री कदम यांनी राज्यात थैमान घातले आहे. त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि न दिल्यास हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते आमदार अनिल परब यांनी गुरुवारी येथे केली.

योगेश कदम यांची अनेक बेकायदेशीर कृत्ये पुराव्यांसह विधिमंडळात मांडल्यानंतरही मुख्यमंत्री प्रत्येक वेळी त्यांची पाठराखण करीत आहेत. त्यामुळे काहीही केले तरी चालते, आम्हाला अभय आहे, असा संदेश जातो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कदम यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे कदम बिनधास्तपणे वाटेल तसे वागत असल्याचा आरोप परब यांनी केला.

पुण्यातील गुन्हेगारीकडे लक्ष वेधताना पुणे जिल्ह्यात ७० टोळ्या कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरीसारखे प्रकार सर्रास घडत आहेत. या गुन्हेगारांना सरकारचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप परब यांनी केला. कुख्यात गुंड निलेश घायवळ सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर पळून गेला आहे, तरी त्याचे गुंड थैमान घालत आहेत. सचिन घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल होते, त्याला शस्त्रपरवाना कसा दिला गेला, असा सवाल त्यांनी केला.

पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही मंजुरी

कदम यांच्याकडे अर्ज येण्यापूर्वी पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता. पुराव्यांअभावी गुन्ह्यातून झालेली सुटका ही निर्दोष सुटका नसते. असे असतानाही कदम यांच्याकडे अपील आल्यावर त्यांनी सचिन घायवळ किती ‘सज्जन’ आहे, याबाबत निर्णय दिला आहे. ‘लाखो रुपयांची रोकड ने-आण करावी लागते, त्यासाठी परवाना आवश्यक आहे,’ असे घायवळ याने अर्जात नमूद केले होते. यावरून, ही लाखोंची रोकड कुठून येते आणि कुणाला दिली जाते, हा प्रश्न उपस्थित व्हायला हवा होता. पण डागाळलेली पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना मंजूर केला, असा सवाल परब यांनी केला.

यामागे ‘अर्थपूर्ण व्यवहार’!

हा अर्थपूर्ण व्यवहार असेल किंवा कदम यांनी घायवळ यांना ‘माझ्यासाठी काम करा’ असे म्हणून हा परवाना दिला असेल. यामागे स्वार्थ असल्याचा आरोप परब यांनी केला. यानंतरही गृह राज्यमंत्र्यांवरील कारवाईची संधी मिळाल्यानंतरही कारवाई होत नसेल तर लोकायुक्त आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांची टीका

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांच्याविरोधात टीकास्त्र सोडले आहे. परदेशात फरार झालेला गुंड घायवळ याचे सत्ताधारी नेत्यांशी घनिष्ठ संबंध असून तो विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या जवळचा असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी घायवळचा उपयोग केल्याची चर्चा आहे व शिंदे यांनी घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली. शिंदे यांनी गृहराज्यमंत्री कदम यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असावी. किंवा गृहमंत्रालयातून दबाव आला असावा, असा आरोप पवार यांनी केला. घायवळ याचे आमदार संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्याशीही हितसंबंध असल्याचा आराेप त्यांनी केला.