मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी ॲप आधारित वाहन चालकांनी गुरुवारी बंदची हाक दिली असून मुंबई महानगरात सकाळपासून ९० टक्के ॲप आधारित वाहन सेवा बंद आहे. त्यामुळे ओला, उबर, रॅपिडोची सेवा विस्कळीत झाली आहे. या आंदोलनामुळे पर्यायी वाहन सेवेवर ताण आला. तसेच अनेकांनी स्वतःच्या वाहनाने कार्यालयात जाणे पसंत केल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. संपूर्ण दिवसभर मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक येथील नोकरदारांचा प्रवास रखडण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी ओला, उबर, रॅपिडो आणि अन्य ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅबचे चालक विविध प्रकारे आंदोलन करीत होतेपरंतु, अद्याप या मागण्या पूर्ण होत नसल्याने, गुरुवारी ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी कॅब चालकांनी बंदची हाक दिली. ॲप आधारित वाहन सेवा बंद असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहनांचा वापर करावा लागला. मात्र पर्यायी वाहन मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले.

मुंबई शहर आणि उपनगरांतील कार्यालयात किंवा इच्छित ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी ॲप आधारित वाहनांचे आरक्षण करतात. परंतु, गुरुवारी प्रवासी आरक्षण केल्यानंतरही वाहन येत नसल्याने प्रवासी हैराण झाले. तसेच पुणे आणि नाशिकवरून मुंबईत मोठ्या संख्येने प्रवासी येतात. परंतु, चालकांनी गुरुवारी बंद आंदोलन केल्याने पुणे आणि नाशिकवरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

परिवहन आयुक्त कार्यालयाने ओला, उबर, रॅपिडो या तिन्ही कंपन्यांना शासनाने दिलेले दर ॲपवर दाखविण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, या कंपन्यांनी अॅपवर शासनाचे दर लागू केलेले नाही. ॲग्रीगेटर्सना प्रत्येक वाहन फेरीतून मिळणाऱ्या भाड्याच्या किमान ८० टक्के रक्कम चालकांना देणे बंधनकारक केले आहे. परंतु, ॲग्रीगेटर्स कंपन्यांनी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनांना केराची टोपली दाखविली आहे. याचा फटका चालकांना बसत आहे. तसेच बेकायदेशीररित्या पांढऱ्या रंगाची वाहन क्रमांकाची पाटी व पेट्रोल बाइकवरून बाइक टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. बाइक टॅक्सीद्वारे चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असाआरोप भारतीय गिग कामगार मंचने केला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले आहे. चालक मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. – डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच