मुंबई : लोकार्पण होऊन १८ महिने होत नाहीत तोच सप्टेंबरमध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूवर खड्डे पडले आणि काही ठिकाणी पृष्ठभागाची झीज झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून सेतूचे बांधकाम केल्याचा दावा फोल ठरला आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) टीकेची झोड उठली. त्यानंतर एमएमआरडीएने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आणि आता अटल सेतुवरील रस्त्याच्या पुनर्पृष्टीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.

अटल सेतुवर खड्डे पडलेल्या आणि पृष्ठभागाची झीज झालेल्या रस्त्याच्या भागाचे पुनर्पृष्टीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार सध्या नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही भागाचे पुनर्पृष्टीकरण सुरू असून टप्प्याटप्प्याने उर्वरित भागाचे पुनर्पृष्टीकरण केले जाणार आहे. दरम्यान, हे काम सुरू असलेला भाग, मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालक-प्रवाश्ांची काहीशी गैरसोय होणार आहे.

मुंबई आणि नवी मुंबई अंतर १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने २१.८ किमी लांबीचा अटल सेतू बांधला. अटल सेतुचे लोकार्पण जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र लोकार्पणानंतर अवघ्या १८ महिन्यांत सप्टेंबर २०२५ मध्ये अटल सेतुवर मोठे खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे समोर आले. समाज माध्यमावरून यासंबंधीची चित्रफित फिरू लागली आणि नागरिकांनी कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले.

या वृत्तानंतर अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी अटल सेतुची पाहणी केली आणि त्यानंतर एमएमआरडीएने रस्त्यांच्या तात्पुरत्या डागडुजीचे काम हाती घेतले. पावसाळा सुरू असल्याने रस्त्याचे पुनर्पृष्टीकरण करणे शक्य नव्हते. एमएमआरडीएने पावसाळ्यानंतर रस्त्याचे पुनर्पृष्टीकरण करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले. तसेच खड्डे प्रकरणी कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाईही केली. कंत्राटदार देवू-टाटा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसला एक कोटी रुपये दंड ठोठावला. तसेच दोष दायित्व कालावधीही एक वर्षाने वाढविला.

पावसाळा संपल्यामुळे आता कंत्राटदाराने अटल सेतुवरील ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले, जिथे रस्त्याच्या पृष्ठभागाची झीज झाली, त्या भागाच्या पुनर्पृष्टीकरणाच्या कामाला नुकतीच सुरुवात केल्याची माहिती एमएमआरडीएने एक्सवरून (ट्विटर) दिली. डेंस बिट्युमिनस मॅकॅडम आणि अस्फाल्ट क्राँक्रीटचा वापर करून रस्ते गुळगुळीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुरूस्तीसाठी अटल सेतू पूर्णपणे बंद ठवणे शक्य नाही. त्यामुळे काही भाग बंद करून तिथे पुनर्पृष्टीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या नवी मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरील १०.४ किमी लांबीच्या रस्त्याचे पुनर्पृष्टीकरण केले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस प्रवासी-वाहनचालकांची गैरसोय होणार आहे.

दरम्यान, अटल सेतुच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्यानंतर नागरिकांकडून समाज माध्यमांवर एमएमआरडीएवर टीका केला जात आहे, कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहींनी तर दंडात्मक कारवाईची रक्कम वाढवून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही समाज माध्यमांवर केली आहे.