मुंबई : अविवाहित तरुणीने जन्म दिलेल्या एका नवजात बालकाची विक्री करणाऱ्या पाच जणांना शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एका डॉक्टरसह चार महिलांचा समावेश असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.
गोवंडीच्या प्लॉट नंबर ५ परिसरात रॉयल हॉस्पिटल या नावाने एक प्रसूती गृह आहे. या प्रसूती गृहात नुकत्याच जन्मलेल्या एका नवजात बालकाची विक्री होणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी तात्काळ खात्री करून घेतल्यानंतर शनिवारी सायंकाळी रुग्णालयात छापा टाकला.
पोलीसांना तेथे एक नवजात बालक मिळाले. यावेळी पोलीसांनी तेथे असलेल्या काही महिला कर्मचार्यांची चौकशी केली असता पहिल्यांदा त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी हे नवजात बालक नवी मुंबई परिसरात राहणार्या एका अविवाहित तरुणीचे असल्याचे पोलीसांना सांगीतले.
तरुणीने या बालकाला जन्म दिल्यानंतर तिला त्याच दिवशी घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टर या बालकाची काही दिवसातच पाच लाख रूपयांना विक्री करणार होते. त्यानुसार पोलीसांनी हे रुग्णालय चालवणाऱ्या कय्यामउद्दीन खान या डॉक्टरला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीसांनी डॉक्टरसह या रुग्णालयात काम करणाऱ्या तसेच बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिला अशा एकूण पाच जणांना अटक केली असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.
