मुंबई : बाणगंगा तलावाच्या तळाशी असलेले गेट व्हॉल्व अनेक दिवसांपासून उघडण्यात न आल्याने तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचाही पाणीपातळीवर परिणाम झाला असून या पाण्याचा योग्यरीत्या विसर्ग व्हावा, यासाठी जीएसबी टेम्पल ट्रस्टतर्फे प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक रहिवाशांनी बुधवारी तलावाच्या तळाशी जाऊन गेट व्हॉल्व उघडण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. त्यांनतर, व्यावसायिक गोताखोरांना बोलावून व्हॉल्व हटविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यंदा गणेशोत्सवात ६ फुटांखालील गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्त्रोत विसर्जन करण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे वर्षानुवर्ष बाणगंगा तलावात गणेश विसर्जन करणाऱ्या नागरिकांना यंदा गणेश विसर्जन कृत्रिम तलावात करावे लागल्याने त्यांच्यात नाराजी पसरली होती. स्थानिकांच्या मदतीने बाणगंगा तलावाच्या तळाशी असलेले गेट व्हॉल्व उघडून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, गणेश विसर्जनासाठी तलावातील गेट व्हॉल्व उघडले नव्हते.
मात्र, नागरिकांना गणेश विसर्जन करण्याची मुभा देण्यात न आल्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली आणि स्थानिकांनी गेट व्हॉल्व उघडले नाहीच. त्यामुळे पाणी साचून राहिले. तसेच, गणेशोत्सव कालावधीत झालेल्या पावसामुळे तलावातील पाणीपातळी सातत्याने वाढत होती. सध्या या तलावातील पाणीपातळी कमी करण्यासाठी जीएसबी टेम्पल ट्रस्टतर्फे प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी त्यासाठी स्थानिक तरुणाने तलावात उडी मारली आणि तळाशी जाऊन गेट व्हॉल्व उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा साठा प्रचंड असल्यामुळे गेट व्हॉल्व उघडता आले नाही.
पूर्वी तलावात ब्रिटिशकालीन व्हॉल्व होते. त्याची चावी फिरवताच सहज पाण्याचा निचरा व्हायचा. मात्र, आता गेट व्हॉल्व बसवण्यात आले असून त्यावर लादी ठेवली आहे. ती वेळोवेळी हलवून पाण्याचा निचरा करावा लागतो. पाण्याचा साठा अधिक असल्याने स्थानिकांना गेट व्हॉल्व उघडणे शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी व्यावसायिक पाणबुड्यांना बोलावून पुन्हा प्रयत्न केले जातील, अशी माहिती जीएसबी टेंपल ट्रस्टचे सेक्रेटरी दीपक वालावलकर यांनी दिली.
बाणगंगा तलावातील पाण्याचा विसर्ग योग्यरीत्या व्हाव्या, यासाठी गेट व्हॉल्व बसण्यासाठी कार्यादेश दिले आहेत. लवकरच त्यासंबंधित कामे हाती घेण्यात येतील, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.