मुंबई : मुंबईकरांना उत्कृष्ट सेवा देणारी बेस्ट बस मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची आहे. बेस्ट मुंबईकराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. बेस्टच्या बस ताफ्यातील जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत १५ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेवटच्या स्वमालकीच्या अशोक लेलँड सीएनजी बसपैकी एका बसगाडीला निरोप देण्यात आला. मालवणी बस आगारात ११ ऑक्टोबर रोजी या बेस्ट बसला निरोप देण्यात आला. सजवलेल्या बसची शेवटची फेरी पार पडली.

बेस्टच्या ताफ्यातील विनावातानुकूलित बसगाड्या काळाच्या पडद्याआड जात असून आता विद्युत वाहने त्यांची जागा घेत आहेत. मालवणी आगारातील बस क्रमांक १८६४ च्या मालिकेतील शेवटच्या बसगाडीला बेस्टच्या सेवेत १५ वर्ष पूर्ण झाली. आता ही बस २५ ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावणार नाही. दरम्यान बस क्रमांक १८६४ मध्ये शेवटच्या क्षणी इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे, बेस्टने गोराई आगारामधून पर्यायी बस क्रमांक १९४८ ची व्यवस्था केली होती. बस क्रमांक १९४८ १३ ऑक्टोबर रोजी निवृत्त झाली. तर मालिकेतील दुसरी बस क्रमांक १९४९ शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहे.

ही बसगाडी हार, फुले, रिबिनने सजवण्यात आली होती. नारळ फोडून, केक कापून, आगारातील कर्मचाऱ्यांचा या बसगाडीला निरोप दिला. अझरुद्दीन काझी, सुमेध तांबे, रूपक धकाते आणि साहिल पुसाळकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मालवणी येथून या बसची अखेरची फेरी सुरू झाली. आरे कॉलनी, मुंबई आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ, वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि नव्याने सुरू झालेल्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गे (कोस्टल रोड) बस मंत्रालय बस स्थानकावर पोहोचली.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी तेथे या बससोबत छायाचित्रे टिपली. बेस्टने जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत २००९ मध्ये पहिल्यांदा ५५० सर्वसाधारण आणि २५० मिडी अशोक लेलँड बीएस ३ सीएनजी बस खरेदी केल्या होत्या.