BEST Retired Employee Protest: मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी बेस्ट उपक्रमाचे मुख्यालय असलेल्या बेस्ट भवन बाहेर एक अनोखे आंदोलन केले. सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युईटी, अंतिम देयके व करोनाकाळातील भत्ता यापैकी एकही पैसा अद्याप न मिळाल्यामुळे आता ही थकबाकी स्वर्गवासी झाल्यावर देणार का असा सवाल उपस्थित करणारा फलक हातात घेऊन त्याने संपूर्ण व्यवस्थेलाच जाब विचारला आहे.

बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी दिलेला असला तरी अद्याप सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांची देणी बेस्ट उपक्रमाने दिलेली नाही. न्यायालयाने आदेश देऊनही ही देणी देण्यात बेस्ट उपक्रमाला अपयश आले आहे. त्यामुळे उतारवयाकडे झुकलेले सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल झाले आहेत. याच कर्मचाऱ्यांपैकी एक असलेले दीपक जुवाटकर यांनी मंगळवारी हातात फलक घेऊन बेस्ट भवनच्या बाहेर बेस्ट स्थानकाजवळ एकट्यानेच धरणे धरले. त्याच्या फलकावरील संदेश वाचून बेस्ट उपक्रमातीलच काय पण येणारा – जाणारा प्रत्येक जण स्तब्ध होत होता.

जुवाटकर हे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बेस्ट भवन बाहेर उभे होते. येणारे जाणारे सगळेच त्यांच्याकडे आणि फलकावरील मजकूराकडे पाहत होते. अखेर एका पोलिसाने येऊन त्यांची विचारपूस केली व त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. तुमच्या मागण्या योग्य असल्या तरी तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला आझाद मैदानात जावे लागेल, असे त्यांना सांगितले व आंदोलन थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर जुवाटकर आपल्या घरी परतले.

करोनाकाळात काम करूनही एक पैसा नाही…

करोना काळात मी रोज कामावर जात होतो. पण करोनाचा भत्ता मला अजिबात मिळाला नाही. आतापर्यंत फक्त मला भविष्य निर्वाह निधी मिळाला आहे. बाकीच्या थकबाकीसाठी आम्ही किती वाट बघायची, असा आर्त सवालही त्यांनी केला आहे.

हक्काच्या पैशांसाठी भीक मागायची का ?

वारंवार पाठपुरावा करून, आंदोलने करून, न्यायालयात जाऊनही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी मिळत नसल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आता हक्काच्या पैशांसाठी भीक मागायची का असा सवाल दीपक जुवाटकर यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि इतर सर्व प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर एका महिन्यात सर्व देणी मिळतात. मग बेस्टच्या कर्मचाऱ्यांवरच अन्याय का, असा सवालही त्यांनी केला आहे. ३२ वर्षांच्या सेवेनंतर जमवलेले हक्काची लाखो रुपयांची पुंजी म्हातारपणातही मिळणार नसेल तर काय उपयोग, न्यायालयाचेही प्रशासन ऐकत नसेल तर आम्ही काय करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.