मुंबई : बेस्टने प्रवास करणाऱ्यांना यापुढे बसगाड्यांची प्रत्यक्ष माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. बसमार्ग, बसची प्रत्यक्ष आगमनाची वेळ आणि गाडी उशिरा येणार असल्यास त्याचीही माहिती गुगल मॅपवर मिळू शकेल. गुगल आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम (बेस्ट) यांच्यात करार झाला असून त्याचे उदघाट्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.बेस्ट उपक्रमाची बससेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्याचप्रमाणे मुंबई कर प्रवाशांसाठी सोयीस्कर व सुयोग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आपल्या बसगाडीच्या प्रवर्तनाबाबतची प्रत्यक्ष (लाईव्ह) माहिती गुगल मॅपवर देण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाची बुधवारी ७ मे पासून सुरुवात झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक एस व्ही आर श्रीनिवास यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला. या उपक्रमामुळे प्रवाशांना बसगाडीच्या येण्याच्या वेळा, मार्ग आणि संभाव्य विलंब याबद्दलची थेट अद्ययावत माहिती Google Maps एप्लिकेशनमध्ये मिळणार आहे.त्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना कोणती बस पकडायची याची महिती मिळेलच. इतकेच नाही तर त्यांच्या थांब्यावर येणाऱ्या बसची प्रत्यक्ष आगमन वेळही दिसेल. यामुळे अंदाजे प्रवास कालावधी तसेच आणि बस उशिरा येत असल्याचीही माहिती मिळेल.
प्रत्यक्ष माहितीवर आधारित बस येण्याच्या वेळा गुगल मॅप्सवर हिरव्या किंवा लाल रंगात चिन्हांकित केल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीच्या आधारे गुगल मॅप्स ही माहिती प्रत्यक्षात अद्ययावत करेल.यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बेस्ट आणि गुगल मॅपमधील हे सहकार्य मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेचा बेस्ट उपक्रमाला देखील फायदा होईल. प्रवाशांना बस मिळण्याबाबतची जी अनिश्चितता होती ती यामुळे दूर होईल. परिणामी प्रवास सोपा होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या मुंबईकरांना दिशानिर्देशांची आवश्यकता असल्यास त्यांनी या सोप्या चरणांचे पालन करावे :-
१. तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओएस डिव्हाइसवर गुगल मॅप्स ऍप उघडा.
२. तुमच्या गंतव्य स्थानाची निवड करा आणि ‘गो’ आयकॉनवर टॅप करा आणि ‘ स्त्रोत ‘ आणि ‘ गंतव्य स्थान ’ नोंद करा.
३. जर आधीच निवडलेले नसेल, तर हिरव्या किंवा लाल रंगात ठळक केलेली वेळ, बस क्रमांक, मार्ग- प्रत्यक्ष आगमन माहिती पाहण्यासाठी ‘सार्वजनिक वाहतूक ‘ पद्धत (छोटा ट्राम आयकॉन) निवडा.
४. शिफारस केलेल्या निकालावर टॅप केल्याने तुम्हाला मार्गाच्या थांब्यांबद्दल अधिक माहिती पाहता येते.
५. विशिष्ट बसथांबा शोधून बसची प्रत्यक्ष माहिती मिळवणे देखील शक्य आहे. सर्व येणाऱ्या बसेसची यादी पाहण्यासाठी ते आणि त्याचे सूचीबद्ध बस क्रमांक निवडा, स्थान-सक्षम बसेस त्यांची प्रत्यक्ष आगमन वेळ – ETA (हिरव्या किंवा लाल दिव्याने दर्शविलेले) प्रदर्शित करतील.