मुंबई महानगर पालिकेचा महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या बहुचर्चित कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. मात्र या प्रकल्पावरुन सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांकडून वारंवार टीका करण्यात येत आहे. हा रस्ता वरळी भागात असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरुन जाणार असल्याने स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मुंबईच्या वरळी कोळीवाड्याती मच्छीमार गेले दोन महिने त्यांच्या पारंपरिक व रोजगाराच्या हक्काच्या संरक्षणासठी आंदोलन करत आहेत. ३० ऑक्टोबरपासून वरळी कोळीवाडय़ातील मच्छीमारांनी वांद्रे सी लिंक व कोस्टल रोड यांच्या जोडणीचे काम सुरू असलेल्या भागाला वेढा घातला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर महापालिकेत आणि राज्यात विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपाने या प्रकल्पावरुन महापालिकेला इशारा दिला आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. “मुंबईचा मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांना हक्काचे घर मिळावे,कोळीवाडे,गावठाणांचा पुनर्विकास व्हावा म्हणून स्वतंत्र डिसीआर केला नाही. ५०० चौ.फु. घरांना मालमत्ता कर माफ केला, पण त्याचा फायदा आमच्या कोळी बांधवांना होणार नाही. चक्रीवादळात त्यांना मदत केली नाहीत,” असे शेलार म्हणाले.

“समुद्राचे पाणी गोडे करुन मुळ मुंबईकर आगरी,कोळी बांधवांचे समूळ उच्चाटन तुम्ही करणार? कोस्टल रोडसाठी बैठकांचे नाटक करुन स्वतःचेच खरे करायला निघालात काय? हा इशारा समजा, समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या आमच्या दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार!,” असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रकरण काय?

वरळी भागातील पुलाच्या जोडणीच्या भागातील दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ठेवण्यात येणार आहे. पण मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार ६० मीटरचे अंतर समुद्राकडून जुन्या क्लीव्हलॅण्ड बंदराकडे सुरक्षितरीत्या येण्या जाण्यासाठी खूप कमी आहे. सध्याच्या ‘वांद्रे- वरळी सी लिंक’ पुलामुळे, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या या मच्छीमारांचे खोल समुद्रात जाणे, उसळणाऱ्या लाटा, खवळलेला समुद्र व समुद्रतळाचे खडकाळ भागामुळे जिकिरीचे झालेले आहे. त्यात वांद्रे- वरळी कोस्टल रोडच्या समोर आणखी दोन पूल बांधल्यामुळे दोन पिलरच्यामधून खोल समुद्रात मासेमारी करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे ठरेल. त्यामुळे मच्छीमारांना याचा विरोध केला आहे.

दरम्यान, कोस्टल रोड हा शब्द मुंबईकरांसाठी नवीन राहिलेला नाही. समुद्रात भराव टाकून हा रस्ता तयार केला जात असून, वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत महापालिके तर्फे हा सागरी किनारा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर असणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प गेले वर्षभर रखडला होता. कामाच्या सुरूवातीलाच पाच वर्षांत म्हणजेच २०२२ पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. मात्र जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सात महिने या प्रकल्पाचे काम पूर्ण थांबले होते. तसेच त्यानंतर टाळेबंदीमुळे हे काम रखडले होते.

“निवडून येतात आमच्या गावातून अन्…”; आदित्य ठाकरेंवर टीका करत वरळी कोळीवाड्यात स्थानिकांनी बंद पाडलं कोस्टल रोडचं काम

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर समुद्रात भराव टाकून जमीन तयार केली जात आहे. त्यापैकी १७५ एकर (७०.८२ हेक्टर) जमीन आतापर्यंत भराव घालून तयार करण्यात आली आहे. सध्या प्रकल्पासाठी भराव टाकणे, पाइलिंग, बोगदा खणणारी मशीन जमिनीखाली उतरवणे, गर्डरची कास्टिंग आदी कामे सुरू आहेत. प्रस्तावित कोस्टल रोड ४ + ४ लेन भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. प्रकल्प तीन पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे.

पॅकेज ४ प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शिनी पार्क (४.०५ कि.मी.) यादरम्यान उभारण्यात येणार आहेत. पॅकेज १ मध्ये प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस (३.८२ कि.मी.), पॅकेज २ बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक (२.७१ कि.मी ), कोस्टल रोडची एकूण लांबी १०.५८ कि.मी. इतकी असणार आहे. या मार्गावरील बोगद्याची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी. आहे. त्याचबरोबर भूमिगत कार पार्कसाठी ४ जागा आरक्षित आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashish shelar warns shiv sena over coastal road project abn