“निवडून येतात आमच्या गावातून अन्…”; आदित्य ठाकरेंवर टीका करत वरळी कोळीवाड्यात स्थानिकांनी बंद पाडलं कोस्टल रोडचं काम

आदित्य ठाकरे फक्त नारळ फोडायला येतात अशी प्रतिक्रिया यावेळी स्थानिकांनी दिली आहे.

Criticizing Aditya Thackeray locals stopped work on Coastal Road in Worli Koliwada

शिवसेनेचा आणि मुंबई महानगर पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळीतील स्थानिक मच्छीमारांनी जोरदार विरोध केला आहे. शनिवारी वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. यावेळी स्थानिकांनी भर समुद्रात जाऊन कोस्टल रोडचे सुरु असलेले काम बंद पाडले आहे.

कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यात अडचण येत आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी समुद्रात काम सुरु असलेल्या बार्जवर जाऊन काम बंद पाडले आहे.

याआधी मच्छिमारांनी समतोल भूमिका घेत याबाबत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली होती. पण आता प्राधिकरणाच्या हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी मच्छिमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जो पर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका स्थानिक मच्छिमारांनी घेतली आहे.

मच्छिमारांची मुख्य मागणी ही मासेमारीसाठी जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या मधील अंतर २०० मीटर ठेवण्याची असून प्राधिकारण त्याचे अंतर ६० मीटर ठेवण्याचे ठरवले आहे. जर यामुळे दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणत्याच विभागाने स्वीकारली नसल्याच्या आरोप मच्छिमारांनी केला आहे.­

त्यामुळे शनिवारी मच्छिमारांकडून अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले आहे. यावेळी मच्छिमारांनी भर समुद्रात बोटी नेत हे काम बंद पाडले. यावेळी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत त्यांना पर्यावरणाचे काही माहिती आहे का? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्हाला कोण एक दिवस पाहायला येत नाही. निवडून येतात आमच्या गावातून आणि मदत दुसरीकडे करतात असे कसे चालेल. आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वांना घेऊन येतो तुम्ही तुमचा प्रकल्प करा आणि आम्हाला मारून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी स्थानिकांनी दिली. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि आरसीएफ तैनात करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Criticizing aditya thackeray locals stopped work on coastal road in worli koliwada abn

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या