मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी यंदाही दिवाळीचा सण कामगारांसह साजरा केला. जल अभियंता विभागातील चावीवाल्या कामगारांच्या कुर्ला कामगार नगर येथील वसाहतीला गगराणी यांनी सपत्नीक सदिच्छा भेट देऊन दिवाळी साजरी केली.
आपल्या संस्थेचे प्रमुख थेट आपल्या दारी आलेले पाहून, चावीवाले, पंपचालक, कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दादर येथे मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या वसाहतीतही आयुक्तांनी अशीच घरोघरी भेट दिली.
एरवी कडक शर्ट, पॅण्ट अशा पोशाखात आणि कडक शिस्तीत असलेले पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या व्यक्तीमत्त्वाची एक अनोखी बाजूच दिवाळीनिमित्त पालिकेच्या कामगारांना पाहायला मिळाली. आजवर कोणत्याही पालिका आयुक्तांनी कधी कामगारांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या.
मात्र गगराणी यांनी गेल्यावर्षीपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी कामगारांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली. गेल्यावर्षी आयुक्तांनी सफाई कामगारांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली होती. यंदा त्यांनी पाणी पुरवठा विभागातील जलवाहिन्यांच्या चाव्या फिरवणाऱ्या चावीवाल्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. तसेच अग्निशमन दलातील जवानांच्या वसाहतीत जाऊन तिथेही जवानांच्या कुटुबियांना शुभेच्छा दिल्या.
खास दिवाळीनिमित्त सदरा परिधान करून आयुक्त हे आपल्या पत्नी डॉ. शीतल यांच्यासह कामगारांच्या घरी गेले होते. त्यांच्या या कृतीने त्यांनी कामगारांची मने जिंकली. मुंबईसारख्या महानगराला दररोज अनेक सेवांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका सतत जिवंत ठेवत असते.
प्रशासनात धोरणात्मक निर्णय जरी आम्ही घेत असलो तरीही, प्रत्यक्ष शेवटच्या व्यक्तीशी लोकांचा संबंध हा यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा येतो. दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली. यंत्रणा अहोरात्र काम करत असतानाच त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्याची पोचपावती या भेटीच्या निमित्ताने मिळाली, असे उद्गार यावेळी पालिका आयुक्तांनी काढले.
गगराणी यांनी वसाहतीत पाऊल टाकताच, वसाहतीतील कामगार आणि त्यांच्या परिवारासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी सण सुरू झाला. घरोघरी सजलेले तोरण, दारात टिपक्यांनी गुंफलेली विविधरंगी रांगोळी आणि उजळलेले चेहरे – अशा उबदार वातावरणात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गगराणी दांपत्याचे स्वागत केले.
गगराणी दांपत्याने घरोघरी जाऊन दिवाळीचा फराळ शुभेच्छा भेट म्हणून दिला. अनेकांच्या घरात वृद्ध आई-वडील होते, लहान मुलं होती; त्यांच्याशीही गगराणी दांपत्याने गप्पा केल्या, त्यांची विचारपूस केली. ग्रामसेवक वाल्मिकी, बाबा कांबळे, बाळासाहेब गरुड, उत्तम झोरे, गौतम ससाणे या कर्मचाऱ्यांच्या गगराणी यांनी भेट दिली.