मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील पात्र व्यावसायिकांना मोफत २२५ चौ. फुटांचे गाळे वितरीत करण्यात येणार असून त्यामुळे पात्र व्यावसायिकांना अतिरिक्त क्षेत्र मिळणार आहे. मात्र त्या अतिरिक्त क्षेत्रासाठी व्यावसायिकांना बांधकाम शुल्क मोजावे लागेल. त्यानुसार पात्र व्यावसायिकांना डीआरपीकडे २४ आॅगस्टपर्यंत अर्ज दाखल करत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार व्यवसायिकांनी अर्ज करावे असे आवाहन डीआरपीकडून करण्यात आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यात धारावीत किती बांधकामे आहेत, त्यात किती निवासी आणि किती व्यावसायिक आहेत तसेच कोण पात्र, अपात्र आहेत याची स्पष्टता येणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत पात्र व्यावसायिकांना २२५ चौ. फुटाचे मोफत गाळे दिले जाणार आहेत.
१ जानेवारी २००० किंवा त्यापूर्वी तळमजल्यावर अस्तित्वात असलेल्या धारावीतील व्यावसायिक तसेच औद्योगिक गाळेधारकांना अतिरिक्त क्षेत्रफळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डीआरपीकडून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून प्राप्त झालेला गुमास्ता परवाना, बेस्ट प्राधिकरणाने बसविलेले एल टी-११ मीटर असे दस्तावेज डीआरपीकडे संबंधित व्यावसायिकांनी सादर करणे आवश्यक आहे.
मालकी हक्काचा गाळा नसला तरी भाडेकरारावर धारावीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना तसेच उद्योजकांनाही पुनर्विकासात सामावून घेण्याचा निर्णय घेत त्यास नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अपात्र गाळेधारकांना पुनर्विकसित इमारतीत १० टक्के जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे अपात्र व्यावसायिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. वाॅक टू वर्क या संकल्पनेनुसार धारावीचा पुनर्विकास करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे धारावीतील उद्योगधंद्यांना संरक्षण देत स्थानिकांना घराजवळच रोजगाराची हमी देण्यासाठी अपात्र व्यावसायिकांना पुनर्विकासात सामावून घेण्यासह पात्र व्यावसायिकांना अतिरिक्त क्षेत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डीआरपीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अतिरिक्त क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यावसायिकांनी २४ आॅगस्टपर्यंत डीआरपीकडे संमतीपत्र दाखल करावे, असे आवाहन डीआरपीने केले आहे.