मुंबई : मुंबई महानगरात थंडी वाढली असून थंडाव्यामुळे रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली. मध्य रेल्वेवरील विक्रोळी – कांजूरमार्गदरम्यान रेल्वे रुळाला मंगळवारी तडा गेला. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल विस्कळी झाल्या. घटनेचे वृत्त समजताच रेल्वेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रूळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लोकल सेवा पूर्वपदावर आली.

रात्री थंडी आणि दिवसा ऊन असल्याने रेल्वे रूळ रात्री आंकुचन पावतात, तर कडक उन्हामुळे दिवसा प्रसरण पावतात. त्यामुळे रेल्वे रूळाला तडे पडण्याच्या घटना ङडतात. विक्रोळी – कांजूरमार्गदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर मंगळवारी सकाळी ७.३२ च्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. परिणामी, प्रवाशांना फटका बसला. या घटनेमुळे लोकल एका मागे एक उभ्या होत्या.

कल्याण, ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवासी प्रचंड हैराण झाले. विद्यार्थी, नोकरदार, कामगार, छोटे व्यावसायिक आदींना इच्छित ठिकाणी वेळेत पोहचण्यास विलंब झाला. धीम्या मार्गावरील लोकल सेवा बंद झाल्याने, लोकल जलद मार्गावर वळवण्यात आली. यामुळे काही लोकल धीम्या मार्गावरील स्थानकात थांबल्या नाहीत.

प्रवाशांचे हाल

या घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, लोकल सेवा माटुंगावरून जलद डाऊन दिशेने वळवल्या. त्यामुळे सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यानंतर रेल्वेच्या पथकाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. रेल्वे रूळाच्या दुरुस्तीचे काम सकाळी ७.५८ वाजता पूर्ण झाले. मात्र धीम्या मार्गावरून कल्याण – सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना बराच कालावधी लोकल सेवा उपलब्ध नव्हती. प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

वेग मर्यादेमुळे लोकल मंदावल्या

विक्रोळी-कांजूरमार्गदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ८ पासून लोकलचा वेग प्रतितास ३० किमी इतका ठेवण्यात आला. मात्र वेगमर्यादा लागू केल्याने, लोकलची गती मंदावली. त्यामुळे नेहमीपेक्षा लोकल बराच कालावधी उशिराने धावत होत्या.