भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक केलंय. तसेच या कारवाईनंतर माझा ऊर अभिमानाने भरून आल्याची भावना व्यक्त केली. ज्या काळात विकास नव्हता तेव्हा आदिवासींना भडकावणं सोपं होतं. पण आता सगळा विकास सुरू झाला आहे, असंही मत चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी महाराष्ट्र पोलिसांचं खूप अभिनंदन करेल. माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. नक्षलवाद नावाची कीड समाजातून समूळ उखडून फेकली पाहिजे. ज्या काळात विकास नव्हता तेव्हा आदिवासींना भडकावणं सोपं होतं. आता सगळा विकास सुरू झाला. सरकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणलं गेलंय. अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, खंडण्या वसूल करण्यासाठी सर्वस्व उठवणं बरोबर नाही.”

हेही वाचा : “सरकारने हे थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील”; राज्यातील हिंसक घटनांवरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“नक्षलवाद्यांनी शरण आलं पाहिजे. त्यांनी सामान्य जीवन जगलं पाहिजे, अशीच राज्य किंवा केंद्र सरकारची भूमिका असते. त्यामुळे त्यांना जशास तसं उत्तर दिलं त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो. मला त्यांचा खूप अभिमान आहे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

“‘हिंदू मार नही खायेगा’ अशी अमरावतीत स्वाभाविक प्रतिक्रिया…”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्रिपुरात घटना घडली की नाही माहिती नाही त्याची प्रतिक्रिया अमरावती, मालेगावमध्ये येते. प्रतिक्रिया म्हणून धरणे, उपोषण, निदर्शनं, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं हे मी समजू शकतो. पण १५-२० हजाराच्या संख्येने रस्त्यावर उतरायचं का? माजी मंत्री जगदीश गुप्तांसह सगळ्यांची कार्यालयं, दुकानं तोडायची याचा काय संबंध आहे. त्यात कुणाचा हात आहे? जर १३ नोव्हेंबरच्या हिंसाचारात भाजपाचा हात असेल तर मग १२ नोव्हेंबरच्या हिंसाचारात संजय राऊत यांचा हात आहे का?”

“१३ नोव्हेंबरची अमरावतीतील प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. तुम्ही म्हणाल मी चिथावणी देतोय, पण खऱ्याला खरं म्हणायला आम्हाला भिती कधीच वाटत नाही. आम्ही जसे संघाचे कार्यकर्ते आहोत, तसे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारे आहोत. त्यांनी आम्हाला हे चालणार नाही हेच शिकवलं. बाळासाहेब ठाकरे यांनी असा बोटचेपेपणा केला असता तर १९९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदू जीवंत राहिला नसता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महाराष्ट्र भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी हे जाहीरपणे मान्य करेल की बाळासाहेब ठाकरे यांनी ९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना संरक्षण दिलं नसतं तर मुंबईत हिंदू शिल्लक राहिला नसता. त्या शिवसेनेचे वारसदार अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचारावर काही बोलणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil comment on police action of naxalite encounter pbs