मुंबई: वर्षानुवर्षे हक्काच्या अनुकंपा नोकरीसाठी पाठपुरावा करणाऱ्या हजारो बेरोजगारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिला आहे. येत्या शनिवारी ५,१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या ५,१२२ उमेदवांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील.

शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याच्या सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात

नोकरीसाठी निवड झालेल्या एकूण १०,३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३,०७८ उमेदवार हे कोकण विभागातील असून, २,५९७ हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात १६७४, नाशिक विभागात १२५०, तर मराठवाड्यातील १७१० उमेदवारांचा समावेश आहे.