मुंबई: आपल्यावर पोलीस पाळत ठेवून आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात आपला मुक्काम असतो. त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. शुक्रवारी सकाळी साध्या वेशातील एका पोलिसाने थेट शयनखोलीमध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिसऱ्यांदा घडले आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे, असा सवाल त्यांनी केला.

अकोला आणि हिंगोलीतील शिवसेना शिंदे गटाच्या महत्वाच्या स्थानिक नेत्यांनी आज सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सपकाळ यांनी पोलीस आपल्या हालचालींवर नजर ठेवून असल्याची माहिती दिली. सकाळी एक पोलीस थेट शयनखोलीत घुसून टेहळणी करत होता. तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात का? पत्रकार आले आहेत का?, यासह अनेक प्रश्न त्याने विचारले. तुम्ही शयनखोलीत प्रवेश का केला, कोणाचे आदेश आहेत, असे विचारले असता, वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणत वरिष्ठांना फोनवर बोला असे सांगितले. अशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत का, असा प्रश्न करीत विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपाची प्रवृत्ती असल्याची टीका सपकाळ यांनी केली. आधी पेगॅसेस नंतर फोन टॅपिंग केले, आता थेट बेडरुमपर्यंत ते पोहचले आहेत. परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही, असेही सपकाळ म्हणाले.

रोहित आर्य चकमकीची चौकशी करा

पवईत पोलिसांनी रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचे एन्काऊंटर केले. या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवले होते हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, मुलांची सुटका महत्वाची होती पण हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या वेळी एनएसजीचे पथक उपस्थित असताना पोलिसांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचे कारण काय. तो व्यक्ती मनोरुग्ण आहे असे सांगतिले जात आहे, पण याच व्यक्तीने सुंदर माझी शाळासारखे सरकारी उपक्रम राबिवले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर तो उपस्थित होता. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.