मुंबई : लोकसभेत ९९ जागा मिळाल्यावर काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला होता. परंतु त्यानंतर गेल्या दीड वर्षांत झालेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड वगळता काँग्रेसची घसरणच झाली आहे. महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुकांमधील मतचोरीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोपांची राळ उठवली असली तरी त्याचा बिहारमधील मतदारांवर काही प्रभाव पडलेला दिसत नाही.
‘घटना बचाव’ या मुद्द्यावर लोकसभेत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक एवढे संख्याबळ मिळाले नव्हते. या तुलनेत लोकसभेत ९९ जागा मिळाल्या. पण त्यानंतर गेल्या दीड वर्षांतील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी फारशी समाधानकारक दिसत नाही. बिहारमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊनही काँग्रेसला जेमतेम सहा जागा मिळाल्या. महाराष्ट्रात सर्वांच नीचांकी १० जागा मिळाल्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिक जागांची अपेक्षा असताना केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. हरियाणामध्ये सत्तेची अपेक्षा असताना ३७ जागा मिळाल्या. दिल्लीत तर भोपाळाही फोडता आलेला नाही. झारखंडमध्ये पक्षाचे संख्याबळ वाढले एवढाच काहीसा दिलासा.
बिहारमधील मतदारांनी महागठबंधनला नाकारले पण त्याच वेळी काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. उत्तर भारतात काँग्रेसची पिछेहाट कायम असून, जनाधार स्वत:कडे वळविण्यात राहुल गांधी यांना अजूनही यश मिळालेले नाही. बिहारमध्ये काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. मुळात बिहारमध्ये काँग्रेसची अवस्था फार काही चांगली नव्हती. पण राष्ट्रीय जनता दलाबरोबर उगाचच जागावाटपावरून ताणून धरले होते. राजदचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यासही काँग्रेसने आधी आढेवेढे घेतले होते.
व्यावहारिक दिवाळखोरी!
केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेश व बिहार या लोकसभेच्या १२० जागा असलेल्या राज्यांमधून जातो, असे नेहमी म्हटले जाते. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला आमदारांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्यामुळे लोकसभेत काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्यावर काँग्रेसची भिस्त होती. पण याच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस पक्ष आधी तयार नव्हता. यातून काँग्रेसची व्यावहारिक दिवाळखोरी बघायला मिळाली.
मतचोरीचा मुद्दाही निष्प्रभ
मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधी यांनी राळ उठविली आहे. बिहारमधील मतदानाच्या आधल्या दिवशीच राहुल गांधी यांनी हरियाणामधील मतचोरीवरून आरोप केले होतो. निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. राहुल गांधी हे गेले सहा महिने मतचोरीवरून गंभीर आरोप करीत आहेत. निवडणूक आयोग आणि भाजपची पडद्याआढून युती झाल्याचा आरोप करीत आहेत. मतचोरीच्या माध्यमातून भाजप निवडणुका जिंकत असल्याचेही राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पण बिहारमध्ये मतचोरीचा मुद्दा फारसा प्रभावी ठरलेला दिसत नाही. निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करूनही मतदारांनी भाजप आणि नितीशकुमार यांनाच कौल दिला.
निवडणुकीपूर्वी महिला वर्गाला खुश केल्यास निवडणुका जिंकण्यात ते उपयुक्त ठरते हे गणित भाजपने ओळखले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्येही महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपच्या रणनीतीला शह कसा देता येईल याची काँग्रेसमध्ये काहीच व्यूहरचा दिसत नाही.
पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फक्त केरळमध्ये सत्तेची आशा आहे. तमिळनाडूत काँग्रेस दुय्यम भूमिकेत आहे. पश्चिम बंगालमध्ये काहीही ताकद राहिलेली नाही. आसाममध्ये अल्पसंख्याक मतांवर पक्षाची अधिक भिस्त आहे. केरळमध्येच सत्तेची संधी मिळू शकते. पण गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसला एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर आहे.
पाच राज्यांमधील काँग्रेसची कामगिरी
हरियाणा : ३७
जम्मू आणि काश्मीर : ६
झारखंड : १६
महाराष्ट्र : १०
दिल्ली : ०
बिहार : ६
