भाजपच्या ओबीसी अपमान प्रचाराच्या मुकाबल्यासाठी काँग्रेसही मैदानात

काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू केले.

bjp congress
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मधु कांबळे

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करण्यासाठी ओबीसी अपमानाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसची कोंडी करणाऱ्या भाजपचा ओबीसींच्या प्रश्नांवरच मुकाबला करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मोदी आडनावाचा उल्लेख करून केलेल्या अवमानकारक विधानाबद्दल दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या आधारावर लोकसभा सचिवालयाने त्यांची तत्काळ खासदारकीही रद्द केली. त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू केले. मात्र त्याच वेळी भाजपनेही त्याला तेवढय़ाच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. भाजपने त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील असून, राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा मुद्दा पुढे करून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

या मुद्दय़ावर काहीसे पिछाडीवर जावे लागलेल्या काँग्रेसने राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर उपस्थित केलेल्या अदानी घोटाळय़ाचा विषय तितकाच जोरकसपणे पुढे आणून भाजपला घेरण्याची मोहीमच उघडली आहे.  या संदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीने २८ मार्चला सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना व वरिष्ठ नेत्यांना पत्रे पाठवून ओबीसीच्या मुद्दय़ावर भाजपचा मुकाबला करण्यासाठी त्या-त्या राज्यांनी स्वतंत्र रणनीती तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात काँग्रेस नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्यावर जो अन्याय केला गेला, तो झाकण्यासाठी भाजपने ओबीसीच्या अपमानाचा मुद्द पुढे करून खोटा प्रचार सुरू केला आहे.

राहुल गांधी यांची कोलारमध्येच पहिली सभा

२०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कर्नाटकमधील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली व त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. भाजपकडून त्यांच्याविरोधात ओबीसी अपमानाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तर राहुल गांधी त्याच कोलारमधून कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराला प्रारंभ करणार आहेत, भाजपच्या खोटय़ा प्रचाराचा ते पर्दाफाश करतील, असे प्रदेश काँग्रेसमधून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST
Next Story
मंत्रालयात देयकांसाठी लगबग, आर्थिक वर्षांचा शेवटचा दिवस असूनही गर्दी मात्र कमी 
Exit mobile version