Ramesh Chennithala On BMC Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आल्याच पाहायला मिळत आहे. यातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस पक्षाने एक मोठी घोषणा केली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील पक्षांना धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? याबाबतही वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

रमेश चेन्निथला काय म्हणाले?

“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. २२७ जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. आमच्या पक्षाची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांची हिच इच्छा आहे की आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळे आम्ही महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत”, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.

स्वबळावर निवडणूक लढवण्याचं कारण काय?

रमेश चेन्निथला यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं कारण काय आहे? यावर रमेश चेन्निथला यांनी म्हटलं की, “स्थानिक पातळीवरील निवडणुका आहेत, त्यामुळे आमचे कार्यकर्ते जे बोलत आहेत, त्यांची जी इच्छा आहे, तो निर्णय आम्ही घेतला आहे. काहीही अडचण येणार नाही, येणाऱ्या दिवसांत आम्हाला आमचा पक्ष आणखी मजबूत करायचा आहे”, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं.

काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनीही स्वबळाची केली होती घोषणा

“आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. तसेच पक्षाच्या हायकमांडबरोबर चर्चा झाल्यानंतरच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि आमच्या लोकांनी देखील तेच ठरवलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.