इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात पोटनिवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ही पोटनिवडणूक ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कसोटी ठरणार आहे. शिवसेनेकडे सहानुभूती आणि लटके यांचे मतदार असले तरी गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि नंतर भाजप असा प्रवास करून आलेले मुरजी पटेल हेदेखील काँग्रेसच्या मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

या मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार मतदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, तर शिवसेनेकडून रमेश लटके आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक जगदीश अमीन कुट्टी हे उभे होते. या तीन उमेदवारांमध्ये ही प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी रमेश लटके यांना ६२ हजारांहून अधिक मते मिळाली होती, तर त्या खालोखाल मुरजी पटेल यांनी ४५ हजार मते आणि कुट्टी यांना २७ हजार मते मिळाली होती.

मुरजी पटेल हे काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. २०१६ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या निवडणुकीत मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून िरगणात उतरले होते. यंदा भाजपने त्यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली आहे. तसेच आजही त्यांचा काँग्रेसच्या मतदारांशी संपर्क आहे, असे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे महाविकास आघाडी झालेली असली तरी काँग्रेसची मते व्यक्तिगत पातळीवर मुरजी पटेल यांनाच मिळतील अशी भाजपला आशा आहे.

तर रमेश लटके यांना मानणारा वर्ग या विभागात असल्यामुळे त्यांची पारंपरिक मते, शिवसेनेची मते व काँग्रेस सोबत असल्यामुळे ती मतेदेखील ऋतुजा लटके यांनी मिळतील असा विश्वास ठाकरे यांच्या शिवसेनेला आहे.

या विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे नऊ प्रभाग येतात. मुरजी पटेल व त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक होते. मात्र त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर एका जागी शिवसेनेचे संदीप नाईक तर दुसऱ्या जागी काँग्रेसचे नितीन सलाग्रे निवडून आले होते. त्यामुळे या भागात शिवसेनेचे संदीप नाईक, प्रमोद सावंत व सदा परब असे तीन माजी नगरसेवक आहेत तर काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा राय यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच जगदीश कुट्टी, विन्नी डिसोझा हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. तर भाजपचे सुनील यादव आणि अभिजीत सामंत यांचे प्रभागही या मतदारसंघात येतात. 

२०१९च्या विधानसभा निवडणुकीतील मते

’ रमेश लटके (शिवसेना)-  ६२,७७३

’ मुरजी पटेल (अपक्ष)-  ४५,८०८

’ जगदीश कुट्टी (कॉंग्रेस)-  २७,९५१

’ एकूण मतदान-  १,४७,११७

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress voters will be decisive in andheri by election zws