शिवसेनेला जशात तसे प्रत्युत्तर देऊ : पाटील
मुंबई : भाजप आता पूर्वीची राहिलेली नसून शिवसेनेला पुरुन उरेल. महाविकास आघाडीतील भ्रष्टाचारी मंत्री व नेते एकापाठोपाठ एक तुरुंगात जातील आणि भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष सुरूच ठेवेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिला.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक असून राज्यभरात एक हजाराहून अधिक ठिकाणी आंदोलने करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वेस्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची अनेक प्रकरणे आतापर्यंत उघड झाली आहेत. मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार व गैरव्यवहार सुरू असून किरीट सोमय्या व अन्य भाजप नेते पुराव्यांसह ही प्रकरणे उघड करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही चौकशी सुरू असून भ्रष्ट नेत्यांची तुरुंगात जाण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोना आणि आता तब्येतीच्या कारणामुळे प्रामुख्याने दृकश्राव्य माध्यमातून कामकाज करीत आहेत. आता मंत्री तुरुंगात जात असून आणखीही जातील, मग तेही त्याच पध्दतीने काम करणार का, यासाठी सत्ता मिळविली आहे का, नागरिकांच्या प्रश्नांचे काय होणार, असे सवाल पाटील यांनी केले.
भाजप आता दबणार नाही. किरीट सोमय्यांसह काही भाजप नेत्यांना महाविकास आघाडीकडून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने पुढील काळात कारवाया होतील. पण आम्ही संघर्ष सुरूच ठेवू. देशहिताचा मुद्दा महत्त्वाचा असून बाँबस्फोटातील आरोपींशी आर्थिक हितसंबंध ठेवणाऱ्या मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली खार रेल्वेस्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले.