मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या प्रकल्पाचा (१७.५० किमी) अविभाज्य घटक असलेल्या कुर्ला उड्डाणपुलाच्या बांधकामात जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान प्रगती झाली आहे. कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे (१०.१ किमी) नवीन रेल्वे मार्ग टाकणे आणि कुर्ल्यापुढील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) यांच्याद्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. एमयूटीपी-२ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका, सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका आणि ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका हे येतात. या तिन्ही प्रकल्पांना २००८ साली मंजुरी मिळाली. त्यातील ठाणे ते दिवा मार्गिकेचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत ही मार्गिका दाखल झाली. मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम टप्याटप्याने पूर्ण केले जात आहे. परंतु, गेल्या अनेक कालावधीपासून सीएसएमटी ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका हा प्रकल्प प्रलंबित होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे.

हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास लवकर व्हावा गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेल्वे मार्गाना सामावून घेण्यासाठी हार्बर मार्गाचे फलाट ७ आणि ८ तोडले जात आहेत आणि रेल्वे वाहतूक नव्याने बांधलेल्या उन्नत डेक तयार केला जात आहे. उड्डाणपुलाचा विस्तार १,३३९ मीटर असून ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ४१३ मीटर रॅम्प, पनवेलच्या दिशेने ४२२ मीटर रॅम्प आणि ५०४ मीटर सपाट भाग आहे. कामाच्या व्याप्तीमध्ये एक नवीन स्थानक इमारत देखील समाविष्ट आहे.

पूर्व-पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांची रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी, टिळकनगर टोकापर्यंत स्थानकाच्या सर्व पादचारी पुलांना जोडणारा एक स्कायवॉक बांधण्यात येत आहे.

कुर्ला स्थानकावरील फलाट १ ते ६ वरून सीएसएमटी ते कसारा, खोपोली अप आणि डाऊन लोकल चालविण्यात येतात. तर, फलाट क्रमांक ७, ८ मार्गावरून सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल धावतात. मात्र मेल, एक्स्प्रेस आणि मालगाड्यामुळे लोकल फेऱ्यावर आणि गतीवर मर्यादा येते. त्यामुळे कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ७, ८ जवळ उन्नत मार्ग बनविण्यात येत आहे. उन्नत मार्गाचे कसाईवाडा ते सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोड म्हणजे एलटीटी येथे शेवट असणार आहे. कसाईवाडा येथे तीन फलाट बांधण्यात येणार आहेत. पादचारी पूल, स्कॉयवॉक बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा प्रदान करण्यात येईल.