मुंबई : मुंबईतील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पुरविणारे शेकडो डबेवाले येत्या २० ऑक्टोबरपासून पाच दिवसांच्या रजेवर जात आहेत. बहुतांश डबेवाले पुण्यामधील मावळ भागातील असून अनेकांनी दिवाळीनिमित्त गावी जाण्याचा बेत आखला आहे. तर, अनेकजण मुंबईत राहूनच दिवाळी साजरी करणार आहेत.

गेली अनेक वर्षे मुंबईतील विविध कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना नित्यनियमाने दररोज घरचा दुपारचा जेवणाचा डबा पोहोचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करतात. मात्र, दरवर्षी गावची यात्रा, पंढरपूरची वारी व अधूनमधून मोजक्या सणाच्या दिवशी ते सुटी घेतात.

यंदा दिवाळीनिमित्त डबेवाल्यांनी पाच दिवसांची सुटी घेतल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार आहे. जेवण डबे पोहोचवण्याची सेवा २० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत बंद राहणार आहे.

या पाच दिवसांपैकी दोन दिवस सार्वजनिक सुट्टी आहे. सोमवार, २७ ऑक्टोबरपासून डबेवाल्यांची सेवा नियमितपणे सुरू होईल. या दिवसाच्या रजेचा पगार कापून घेऊ नये. दिवाळी बोनस म्हणून एक ज्यादा पगार द्यावा व तो सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्याच्या पगाराबरोबर द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने ग्राहकांकडे केली आहे.