Mumbai Metro Line 2B Update: ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले दरम्यानच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग आता मोकाळा झाला आहे. या टप्प्यासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून नुकतेच सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गिकेच्या लोकार्पणाची शक्यता आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) त्यादृष्टीने तयारी करीत आहे. लवकरच लोकार्पणाची तारीख जाहीर होण्याची शक्यता असून हा पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना मेट्रोतून डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान प्रवास करता येणार आहे.
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २२ किमी लांबीच्या आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. मंडाले – डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन – अंधेरी पश्चिम असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी डायमंड गार्डन – मंडाले टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या टप्प्यातील मार्गिकेच्या कामाला वेग देऊन एप्रिल २०२५ मध्ये डायमंड गार्डन – मंडालेदरम्यान मेट्रो गाड्यांच्या आणि विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली.
आता चाचण्या अंतिम टप्प्यात असल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल अशी अपेक्षा सरकार आणि एमएमआरडीएला होती. त्यामुळेच नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो ३ मार्गिकेतील शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या दिवशीच ८ ऑक्टोबर रोजी डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याचेही लोकार्पण करण्याची तयारी सुरू होती. मात्र या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने ८ ऑक्टोबरचा मुहूर्त चुकला. पण आता मात्र या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
डायमंड गार्डन – मंडाले टप्प्यासाठी नुकतेच सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली. आता राज्य सरकारकडून वेळ मिळाल्यानंतर तात्काळ या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यांची वेळ मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते आहे. या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते ३० किंवा ३१ ऑक्टोबर रोजी करण्याचे प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळे आता सरकारकडून लोकार्पणाच्या तारखेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
अशी आहे ‘मेट्रो २ ब’ मार्गिका
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ला जोडणारी मेट्रो मार्गिका म्हणजे ‘मेट्रो २ ब’ मार्गिका. २३ किमी लांबीची आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेमुळे अंधेरी पश्चिम – मंडाले असा प्रवास काही मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे ही मार्गिका मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अंदाजे १० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यापैकी पहिला टप्पा डायमंड गार्डन – मंडाले आणि दुसरा टप्पा डायमंड गार्डन – अंधेरी पश्चिम असा आहे.
ही संपूर्ण उन्नत मेट्रो मार्गिका असून अनेक रेल्वे मार्ग ओलांडून ही मार्गिका जाते. या मार्गिकेतील कारशेड मंडाले येथील ३१ एकर जागेवर उभारण्यात आली आहे. या कारशेडमध्ये एका वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. डायमंड गार्डन – मंडाले हा पहिला टप्पा ५.६ किमी लांबीचा असून या टप्प्यात मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन अशी स्थानके आहेत.