मुंबई : गावकुसापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास सुरू होणार असून परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली एक भव्य गाथा पडद्यावर झळकणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबरपासून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजेच ‘दशावतार’ रसिकप्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू आदी वैविध्यपूर्ण भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत करणारे दिग्गज अभिनेते ‘दिलीप प्रभावळकर वयाच्या ८० व्या वर्षी एका नव्या अवतारात रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा ही वेगळीच भूमिका असून ‘दशावतार’मधून रसिकांना ते पुन्हा आश्चर्यचकित करणार आहेत. या रहस्यमय चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांची गूढ भूमिका रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करणार असून, त्यांचा न पाहिलेला अवतार हा चित्तथरारक अनुभव देणारा ठरणार आहे.

कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे. कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग ५० दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असल्यामुळे कोकणच्या भव्यतेचा अनुभव रसिकप्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘दशावतार’ चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत. तर या चित्रपटाची पहिली झलक लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

‘दशावतार चित्रपटात आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी, आव्हानात्मक आणि सगळ्यांना चकित करणारी भूमिका साकारायला मिळाली, याचा आनंद आहे. वयाची मर्यादा अभिनेत्यांना नसते, नवनवीन भूमिका आणि आव्हाने मला खुणावत असतात. याप्रमाणेच हे एक भव्य आव्हान आहे’, असे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip prabhavalkar new marathi film dasavatar based on mystical storyline and traditions of konkan mumbai print news vsd